शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपासह आरपीआयही जोमात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 12:45 PM2019-04-24T12:45:43+5:302019-04-24T12:54:19+5:30
मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.
हणमंत पाटील
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार महाआघाडीकडून रिंगणात उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजपा व आरपीआय (आठवले गट) यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत बारणे यांचे प्रतिस्पर्धी असलेले आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपाचे शहराध्यक्ष आहेत. दोघांमध्ये पारंपरिक वाद आहेत. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईनंतर दोघांमध्ये दिलजमाई घडवून आणण्यात आली. त्यानंतर बारणे यांचा उमेदवारीअर्ज भरण्याच्या कार्यक्रमापासून जगताप सक्रीय झाले आहेत. मात्र, जगतापसमर्थक भाजपाचे काही नगरसेवकही केवळ तोंड दाखविण्यापुरते प्रभागातील कोपरा सभा व बैठकांना उपस्थित राहताना दिसत असून, पूर्णपणे सक्रीय नसल्याचे चित्र आहे.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महायुतीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणीही शिवसेना, भाजपा व रिपब्लिकनचे कार्यकर्ते एकत्र बसून निजोयन करताना दिसतात.
भाजपाचे नियोजन बूथनुसार झालेले असल्याने अगोदरपासून काम सुरू करण्यात आल्याचे अमोल थोरात यांनी सांगितले. रिपब्लिकनच्या स्थानिक नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांचा आगामी विधानसभा डोळ्यापुढे ठेवून लोकसभेच्या प्रचारात सक्रीय सहभाग दिसून आला. महायुतीतील नेत्यांमध्ये दिलजमाई झाली, आता महायुतीतील कार्यकर्त्यांनाही सक्रीय करण्याचे आव्हान आहे.
..............
युतीचा एकदिलाने प्रचार
मावळ लोकसभेच्या प्रचारात महायुतीतील भाजपा, शिवसेना, आरपीआय, रासप असे सर्व मित्रपक्ष एकदिलाने काम करीत आहेत. - श्रीरंग बारणे, उमेदवार, शिवसेना
.........
भाजपाचा सक्रियतेचा दावा
नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून महायुतीच्या प्रचारात सक्रीय आहेत.
- अमोल थोरात, संघटक सरचिटणीस, भाजपा
.............
प्रभागनिहाय बैठकांवर भर
आमचे नेते रामदास आठवले यांचे आदेश आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय प्रत्येक १० कार्यकर्त्यांवर जबाबदारी दिली आहे. प्रचारासाठी बैठका, कोपरा सभा सुरू आहेत.
- चंद्रकांता सोनकांबळे, स्थानिक नेत्या, आरपीआय
...........
सहा विधानसभा मतदारसंघांतील मित्रपक्षांच्या गोटात काय चाललेय?
१. पिंपरी : हा शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा मतदारसंघ असून, येथे भाजपाची ताकत वाढली आहे. आरक्षित मतदारसंघात महायुतीच्या प्रचारात भाजपापेक्षा आरपीआय सक्रीय असल्याचे चित्र.
२. चिंचवड : या विधानसभेत भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आहेत. बारणे व जगताप यांची दिलजमाई झाली, तरी मतदारसंघात समर्थकांचे मनोमिलन झाले नसल्याने ते प्रचारात सक्रीय दिसत नाही.
३. मावळ : येथे भाजपाचे आमदार बाळा भेगडे असून, त्यांचे पक्षातील प्रतिस्पर्धी सुनील शेळकेही सक्रीय आहेत. या मतदारसंघात भाजपाचे कार्यकर्ते पुढे आणि शिवसेनेचे नाराज गट प्रचारात मागे दिसून येत आहे.
४. पनवेल : येथे भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर हे मतदारसंघातील शिवसेनेपेक्षा अधिक सक्रीय आहेत. भाजपाला अधिक मान दिला असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी दिसून येत आहे.
५. उरण : मतदारसंघात शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर आणि भाजपाचे पदाधिकारी एकत्रितपणे महायुतीचा प्रचार करीत आहेत. येथे महायुतीच्या उमेदवाराला अधिक मताधिक्य देण्याची धडपड दिसत आहे.
६. कर्जत : येथे राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड असूनही गतपंचवार्षिक निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना मताधिक्य होते. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पुन्हा आघाडी घेण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे.