Pune Crime: भोसले नगर परिसरात पुन्हा जबरी चोरी; ८५ तोळे सोने, हिऱ्याचे दागिने चोरीला
By नितीश गोवंडे | Published: November 29, 2023 01:13 PM2023-11-29T13:13:09+5:302023-11-29T13:14:54+5:30
या जबरी चोरीच्या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे....
पुणे : शहरात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भोसले नगर परिसरात जबरी चोरीची घटना घडली होती. यामध्ये चोरांनी ३२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. यानंतर २७ नोव्हेंबर रोजी पुन्हा याच भागातील एका बंद फ्लॅटमधून ८५ तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याचे व एम रॅली दागिने असा १७ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या जबरी चोरीच्या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
याप्रकरणी चैत्राली हर्षद भागवत (३२, रा. फाईव सेनसाई बिल्डिंग, अशोक नगर हौसिंग सोसायटी, भोसले नगर) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २५ नोव्हेंबर रात्री सात ते २७ नोव्हेंबर सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चैत्राली भागवत या फाईव सेनसाई बिल्डिंगच्या पहल्या मजल्यावर राहतात. २५ नोव्हेंबर रोजी त्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. भागवत यांच्या खोलीमधील लॉकर फोडून चोरट्यांनी त्यामधील १७ लाख ४५ हजार रुपये किमतीचे ८५ तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याचे व एम रॅली चे दागिने चोरून नेले. चैत्राली भागवत या २७ नोव्हेंबर रोजी घरी आल्या असता त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.