Maharashtra Rain: वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुण्यात सूर्याचे दर्शन, सायंकाळनंतर पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 05:09 PM2024-06-13T17:09:51+5:302024-06-13T17:11:21+5:30
राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मॉन्सून पोचला असून, केवळ विदर्भातील काही भागात तो अद्याप गेलेला नाही...
- श्रीकिशन काळे
पुणे : राज्यात रायगड, पुणे, सोलापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांमध्ये विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, पुण्यात दुपारी पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले. सायंकाळनंतर मात्र पुन्हा पावसाचा अंदाज दिला आहे.
राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मॉन्सून पोचला असून, केवळ विदर्भातील काही भागात तो अद्याप गेलेला नाही. तरी देखील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, कोकणातील काही भागात जोरदार सरी कोसळत आहेत. माॅन्सूनची गुरूवारी (दि.१३) काहीच प्रगती झाली नाही. परंतु, माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान तयार झालेले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झालेला असेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
सध्या माॅन्सून अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत असून, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट् देखील व्यापलेला आहे. सध्या मॉन्सूनची प्रगती नसल्याने त्याची सीमा नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम या भागात आहे. पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात जाईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस होत असल्याने त्या ठिकाणचे शेतकरी सुखावले आहेत. दरम्यान, शुक्रवारी (दि.१४) विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नगर जिल्ह्यात काही भागात हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. येत्या तीन दिवसांमध्ये संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात सध्या पावसाचा लपंडाव सुरू असून, काही भागात हलक्या सरी कोसळतात, तर काही भागात उघडीप दिली आहे. आज दुपारी आकाश भरून आल्याने जोरदार सरी कोसळल्या. पण अर्ध्यातासानंतर आकाश मोकळे झाले आणि पांढऱ्या ढगांची गर्दी दिसू लागली. पण पुढील दोन-तीन तासांमध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.