सीआरपीएफच्या जवानाला पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचे बारामतीत तीव्र पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 03:18 PM2019-02-18T15:18:18+5:302019-02-18T15:22:47+5:30
शहीद जवानांच्या शोकसभेची परवानगी घेण्यासाठी गेलेल्या सीआरपीएफ जवान अशोक इंगवले यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती.
बारामती : शहीद जवानांच्या शोकसभेची परवानगी घेण्यासाठी गेलेल्या सीआरपीएफ जवान अशोक इंगवले यांना पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचे तीव्र पड्साद बारामतीमध्ये उमटले. बारामती शहरसह सोनगाव, डोलेर्वाडी, झारगड्वाडी आदी गावातील ग्रामस्थांनी बारामती येथील प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अशोक इंगवले यांचे वडील बाबूराव इंगवले यांनी सांगितले ' अशोक हा काही दिवसांपूर्वी सुटीवर आला होता. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्याने त्याला धक्का बसला होता. शहीद जवानांच्या शोकसभेची परवानगी घेण्यासाठी अशोक बारामती तालुका पोलिस ठाण्यात गेला होता. मात्र, त्याला पोलिसांनी जबर मारहाण केली. सबंधित पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.' यावेळी नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी बारामती तालुका पोलीस ठाण्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.