पुण्यात परदेशीय संकल्पना; रस्त्यावर अवतरला 'गोल्डन बॉय रुद्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 08:57 PM2022-11-15T20:57:41+5:302022-11-15T20:57:48+5:30
दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत तो एका ठिकाणी पुतळ्यासारखा उभा राहतो
पुणे: एखाद्या पुतळ्याप्रमाणे तो चौकाच्या एका कोपऱ्यात उभा होता. त्याला ये-जा करणारे सर्वजण पाहत होते. संपूर्णपणे सोनेरी रंगाचा, डोळ्यांवर गॉगल घातलेला, डोईवर टोपी घातलेली. त्याचे नाव आहे गोल्डन बॉय रूद्र. परदेशात रस्त्यांवर अशा प्रकारची कला दाखवली जाते. ती आता पुण्यातही पहायला मिळत आहे.
गोपाळ कृष्ण गोखले चौकात म्हणजेच गुडलक चौकात हा गोल्डन बॉय दिसत आहे. दोनच दिवस झाले तो पुण्यात आला आहे. दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत तो एका ठिकाणी पुतळ्यासारखा उभा राहतो. समोर एक डब्बा ठेवलेला असतो. त्यामध्ये ज्यांना त्याची कला आवडेल तो पैसे टाकतो. केवळ उभा तर राहायचे आहे? त्यात काय एवढे? अशी प्रतिक्रिया अनेकांची असते. पण एखाद्या पुतळ्यासारखे उभे राहण्यासाठी खूप सराव करावा लागतो. तसेच चेहऱ्याला गोल्डन कलर लावावा लागतो. एक हात वर अधांतरी ठेवावा लागतो. त्यामुळे या अवस्थेत तासनतास तो तसाच उभा राहतो. त्यासाठी रूद्र याने खूप महिने सराव केलेला आहे.
मुंबईमध्ये एक गोल्डन बॉय आहे. तो खूप प्रसिध्द झाला. त्याला पाहून रुद्रने ही कला शिकली. तो उत्तर प्रदेशहून पुण्यात आला आहे. त्यातून दररोज कमाई होत आहे. कोणी दहा रूपये देतो, कोणी वीस तर कोणी पन्नास, शंभर रूपये. पुणेकरांना हा गोल्डन बॉय आवडत असल्याचे दिसून येत आहे. कारण अनेकजण त्याला पाहून फोटो काढत होते आणि त्याच्या डब्ब्यात पैसेही टाकत होते.