परदेशी तरुणीची मुंढव्यात छेडछाड
By admin | Published: August 27, 2015 04:55 AM2015-08-27T04:55:53+5:302015-08-27T04:55:53+5:30
रशियन तरुणीसोबत अश्लील वर्तन केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणीच्या मित्रांवर रोडरोमिओने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना
पुणे : रशियन तरुणीसोबत अश्लील वर्तन केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणीच्या मित्रांवर रोडरोमिओने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास मुंढवा रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल बीच हाऊसमध्ये घडली. मुंढवा पोलिसांनी विनयभंगासह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणाऱ्या तरुण-तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अली सोहन चकलानी ऊर्फ मेमन (वय २७, रा. समृद्धी अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट, लष्कर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी जय हरेश सुमय्या (३८, आॅलिम्पिक टॉवर्स, लोखंडवाला, अंधेरी पूर्व, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. सुमय्या यांच्यासह त्यांचे मित्र विवेन केदारी, आलाप जोशी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकलानी याच्या वडिलांचे हार्डवेअरचे दुकान आहे. तो वडिलांना दुकानात मदत करतो. तर सुमय्या त्यांचे दोन मित्र व रशियन मैत्रिणीसह व्यवसायानिमित्त पुण्यात आले होते. मुंबईमध्ये राहणारे हे सर्व जण भागीदारीत हॉटेल व्यवसाय करतात. रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सुमय्या त्यांचे दोन मित्र व एका मैत्रिणीसह हॉटेल बीच हाऊसमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते, त्या वेळी आरोपी चक लानी याने सुमय्या यांच्या मैत्रिणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.
सुमय्या यांनी त्याला हटकले. यावर चिडलेल्या आरोपीने तरुणीशी अश्लील वर्तन केले. सुमय्या आणि आरोपीमध्ये वाद सुरू झाला. आरोपी चकलानी याने पळत जाऊन हॉटेलच्या स्वयंपाक घरामधून सुरी आणली. जिवे मारण्याची धमकी देऊन सुमय्या यांच्या डोक्यात वार केले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांवरही त्याने वार केले. यातील विवेन केदारी यांच्या नाकाला, तर आलाप जोशी यांच्या डाव्या हातावर वार करून चकलानी पसार झाला. या हल्ल्यामधून तरुणी बचावली.
सुमय्या यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी रविवारी रात्री सव्वाच्या सुमारास गुन्हा दाखल केला. दिवसभरात शोध घेऊन रात्री पावणेदहाच्या सुमारास चकलानी याला बेड्या ठोकण्यात आल्या. छेडछाड रोखण्यासाठी मैत्रिणीला मदत करायला गेलेल्या तरुणावर रोड रोमिओकडून प्राणघातक हल्ला झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत कामानिमित्त घराबाहेर असलेल्या तरुण-तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्याच आठवड्यात विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकतर्फी प्रेमातून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. एक लाख रुपयांची सुपारी देऊन हा हल्ला घडवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना ताजी असतानाच मुंढव्यातील घटना घडल्यामुळे तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरत चालले आहे. महिला पोलिसांची गस्त, छेडछाडविरोधी पथक नेमके काय करीत आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.