Pune : एस. जयशंकर यांनी सांगितली परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्वाची सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 07:14 PM2023-01-28T19:14:42+5:302023-01-28T19:14:58+5:30

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लिखित ‘भारत मार्ग’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन...

Foreign Minister S. Publication of the book 'Bharat Marg' written by Jaishankar | Pune : एस. जयशंकर यांनी सांगितली परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्वाची सूत्रे

Pune : एस. जयशंकर यांनी सांगितली परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्वाची सूत्रे

googlenewsNext

पुणे : विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित 'द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड' या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद 'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक परराष्ट्रमंत्री डॉ. एस.जयशंकर, विजय चौथाईवाले, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जी-२० पूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चर्चा करून आपली भूमिका भारताने मांडावी असे सांगतात तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक कच्ची सामुग्री दिली. यावरून भारताने मिळवलेले यश लक्षात येते. आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना पंतप्रधानांसोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या डॉ. जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे ही पर्वणी आहे.

परराष्ट्र धोरणासंदर्भात भारतीय विचार दर्शविणारे पुस्तक
फडणवीस म्हणाले, पुस्तकात परराष्ट्र धोरणावरील तीन ओझी सांगितली आहेत. पहिले फाळणीचे, दुसरे उशिरा सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे आणि तिसरे आण्विकदृष्टया आपण सक्षम असतानाही त्याला पुढे नेण्यात आपण गमावलेला काळ. त्यामुळे परराष्ट्र धोरणावर परिणाम झाल्याचे पुस्तकात मांडण्यात आले आहे. त्यासोबत चीनने रशिया आणि अमेरिकेच्या मदतीने प्रगती साधली असताना आपण का मागे पडलो याचा उल्लेखही पुस्तकात आहे. आत्ताची भूराजकीय परिस्थिती, तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा देशावर काय परिणाम होणार आहे याची माहिती पुस्तकात आहे. 

क्षमता आणि सहकार्याचा भारत मार्गच देशासाठी उपयुक्त- डॉ. एस. जयशंकर
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले, जागतिकीकरण हे आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत मार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारतमार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल.

परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्वाची सूत्रे
स्वावलंबन, आत्मविश्वास, विषयानुसार सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक अजेंडा, इतर देशातील भारतीयांचा विचार ही परराष्ट्र धोरणाची सहा प्रमुख सूत्रे आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे. देशांतर्गत पुरवठा साखळीही मजबूत करून जागतिक बाजाराशी जोडले जायला हवे. त्यासाठी सूक्ष्म व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत भारताने हेच केले. विविध क्षेत्रात सामंजस्य प्रस्थापित करताना आपल्या आणि जगाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचारनुसार जगाच्या कल्याणाचा विचार योग्य ठरतो, हा विचार भारत मार्ग दर्शवतो.

सर्व राज्यांच्या कल्याणाच्या विचार करणारे परराष्ट्र धोरण हवे
चांगले परराष्ट्र धोरणासाठी देशातील राज्यांचाही सहभाग आणि सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार असायला हवा. परराष्ट्र धोरण ठरवतानाही सामान्य जनांच्या भावनादेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. इतिहासापासून आपल्याला शिकायला हवे, लक्षात ठेवायला हवे, त्याची समीक्षा व्हायला हवी. भविष्यात जगाच्या बाबतीत जागरूक रहायला हवे. जग आज आपल्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. जगात होणाऱ्या घटनांचे परिणाम आपल्या देशावरही होतात. जग बदलत असताना आपल्यालाही त्या वेगाने बदलावे लागेल आणि या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पिढीला जगाच्या बाबतीत अधिक माहिती असणे आवश्यक आहे. 

चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनिती तयार करावी लागेल. जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारीत धोरण ठरवावे लागेल असे पुस्तकात मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Foreign Minister S. Publication of the book 'Bharat Marg' written by Jaishankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.