परप्रांतीय कामगार निघाले गावाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:17+5:302021-04-16T04:11:17+5:30
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने दि. १५ पासून संचारबंदी लागू केली असून, कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. ...
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने दि. १५ पासून संचारबंदी लागू केली असून, कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागू झाल्याच्या भीतीने परप्रांतीय चांगलेच धास्तावले आहेत. बराचसा कामगार वर्ग मिळेल त्या वाहनाने घर गाठत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या काळात या कामगारांचे प्रचंड हाल झाले होते. काहींना वाहन न मिळाल्याने शेवटी या कामगारांनी आपल्या गावी पायी जाणे पसंत केले, तर जाताना त्यांना रस्त्यात उपासमारही सहन करावी लागली होती आणि आता पुन्हा तीच वेळ येऊ नये म्हणून हे कामगार आपआपल्या गावी जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
राज्यात संचारबंदी लागू केल्याने कामगारांअभावी बांधकाम व्यावसायिकांना आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार आहे. बांधकाम व्यवसायाबरोबरच इतर छोटे मोठे उद्योग व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. परप्रांतीय कामगार मिळेल ते काम कमी रोजंदारीवर करत असत. मात्र आता त्यांनी गावाकडची वाट धरल्याने स्वस्त आणि कुशल कामगारांचा तुटवडा भासणार असून, सध्या स्थानिक कामगारांवरच व्यावसायिकांना अवलंबून राहावे लागणार आहे. संचारबंदीच्या काळात काम मिळेल की नाही याबाबत परप्रांतीय कामगारांना शाश्वती नसल्याने दैनंदिन जीवनातील अन्नपाणी, खोलीभाडे व इतर खर्च भागवून घरी किती पैसे पाठवायचे यासारख्या अनेक अडचणी त्यांच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे त्यांनी मिळेल त्या वाहनाने आपल्या घरी जाणे पसंत केले आहे.
१५ रांजणगाव गणपती
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक संचारबंदी जाहीर झाल्याने मजुरांना गावी जाण्याचे वेध लागले आहेत.