Pune: कोकेन विक्री करताना परदेशी नागरिक जेरबंद; उंड्री परिसरात ३० लाखांचे ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 01:07 PM2024-02-17T13:07:06+5:302024-02-17T13:10:02+5:30

पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसरातून अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकाला पकडले. त्याच्या ताब्यातून ...

Foreigner jailed for selling cocaine; Drugs worth 30 lakhs seized in Undri area | Pune: कोकेन विक्री करताना परदेशी नागरिक जेरबंद; उंड्री परिसरात ३० लाखांचे ड्रग्ज जप्त

Pune: कोकेन विक्री करताना परदेशी नागरिक जेरबंद; उंड्री परिसरात ३० लाखांचे ड्रग्ज जप्त

पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसरातून अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकाला पकडले. त्याच्या ताब्यातून तब्बल ३० लाख ४० हजार रुपये किमतीचे १५२ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त केले. हसेनी मुबीनी मीचॉगा (३५, मु. रा. टांझानिया) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली की, एक परदेशी नागरिक कोंढवा परिसरात उंड्री येथे सार्वजनिक रस्त्यावर कोकेन विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित परदेशी व्यक्तीला ताब्यात घेतले. आरोपी हा मूळचा टांझानिया येथील रहिवासी असून, कामानिमित्ताने ताे भारतात आला आणि सध्या ताे उंड्री येथे राहत होता. अंमली पदार्थ विक्री करताना तो पोलिसांना मिळून आला, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी दिली.

साडेचार लाखांचे मेफेड्रॉन जप्त :

विश्रांतवाडी ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके आणि अंमली पदार्थ विरोधी पथक २ हे विश्रांतवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस हवालदार चेतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण लोहगाव धानोरी रस्त्यावर मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी किसन नंदकिशोर लधार (३४, रा. लोहगाव, मु. रा. राजस्थान) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून चार लाख ४० हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम मेफेड्रॉन व दहा हजाराचा एक मोबाईल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपींवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अडीच लाखांचा गांजा हस्तगत :

वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालताना पोलिस हवालदार रवींद्र रोकडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एम्प्रेस गार्डन गेटसमोर घोरपडी येथे सार्वजनिक रस्त्यावर गांजा हा अंमली पदार्थ विक्री करताना ओंकार अनिल चंडालिया (२१, रा. उरळी कांचन) याला पकडले. त्याच्या ताब्यातून दोन लाख ४० हजार रुपये किमतीचा ९ किलो गांजा, एक मोबाईल व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपीवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Foreigner jailed for selling cocaine; Drugs worth 30 lakhs seized in Undri area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.