साडेतीन वर्षांनी फॉरेन्सिक आॅडिट रिपोर्ट न्यायालयात सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:39+5:302021-08-21T04:15:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्या प्रकरणातील महत्वपूर्ण पुरावा असलेला फॉरेन्सिक आॅडिट रिपोर्ट साडेतीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्या प्रकरणातील महत्वपूर्ण पुरावा असलेला फॉरेन्सिक आॅडिट रिपोर्ट साडेतीन वर्षांच्या विलंबानंतर अखेर पुणे पोलिसांकडून शुक्रवारी (दि.20) विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला. हा रिपोर्ट सुमारे एक हजार पानांचा आहे.
डीएसके यांनी ठेवीदारांनी गुंतवलेली रक्कम आणि त्यांच्या व्यवसायातून मिळविलेल्या पैशांचा विनियोग कसा केला? आर्थिक व्यवहार नेमका कसा झाला? एका खात्यातूून दुस-या खात्यात ट्रान्सझँक्शन कशी झाली? त्यांनी कोणत्या नियमांचे उल्लंघन केले? या सर्व बाबी या रिपोर्टमध्ये समाविष्ट आहेत. हा या प्रकरणातील महत्वाचा पुरावा आहे. मात्र हा रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यास पोलिसांना विलंब लागला. रिपोर्ट बनविण्यासाठी 2 डिसेंबर २०१७ रोजी मुंबईतील डी. जी. ठकार अँण्ड असोसिएटसची नियुक्ती करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासाच्या तांत्रिक पुराव्याच्या अनुषंगाने आॅडिट करण्याचे काम या त्यांना देण्यात आले होते. रिपोर्ट सादर न झाल्याने बचाव पक्षाकडून रिपोर्टबाबत मागणी करण्यात आली होती. त्यामुळे तत्कालीन न्यायाधीशांनी एका महिन्यात रिपोर्ट न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यावर तपास अधिका-यांनी ११ मार्च २०१९ रोजी एका महिन्यात अंतरिम रिपोर्ट देवू, असे न्यायालयास सांगितले होते. मात्र, अद्यापही तो सादर करण्यात आला नव्हता.
रिपोर्ट अजून आमच्या हातात आलेला नाही. परंतु, या रिपोर्टमधून ठेवीदारांचे जे पैसे आले ते डीएसके यांनी कुठे गुंतवले? हे समोर येईल. याशिवाय त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांचा याप्रकरणात सहभाग आहे का? हे साध्य झाल्यानंतर जामीन मिळवण्यास अधिक सोपे जाईल, असे शिरीष कुलकर्णी यांचे वकील अँड. आशिष पाटणकर यांनी सांगितले.
----------------------------