भाजीविक्रेत्यांवर वनविभागाची कारवाई, 13 दुकाने जमिनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 02:31 AM2018-08-27T02:31:04+5:302018-08-27T02:31:48+5:30
एनआयबीएम चौक : २० वर्षांपासूनची तेरा दुकाने जमीनदोस्त
कोंढवा : कोंढवा येथील एनआयबीएम चौकात वनविभागाच्या जागेत भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर वनविभागाने कारवाई केली. वनविभागाने केलेल्या कारवाईमध्ये याठिकाणी व्यवसाय करीत असलेल्या १३ व्यावसायिकांची दुकाने जमीनदोस्त केली. गेली २० वर्षे आम्ही याठिकाणी व्यवसाय करीत असून, आमच्या पुनवर्सनाचे काय, असा प्रश्न या वेळी या व्यावसायिकाने उपस्थित केला. मात्र, याकडे दुर्लक्ष केले.
वनक्षेत्र अधिकारी विष्णू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन जेसीबीच्या सहाय्याने एसआपीएफ, कोंढवा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वनखात्याचे कर्मचारी या कारवाईत समाविष्ट झाले होते.
अचानक झालेली कारवाई, पोटापाण्याचा प्रश्न
१ कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम इन्स्टिट्यूटसमोर वनविभागाची जागा आहे. संकटहरण महादेव मंदिरासमोर असलेल्या वनविभागाच्या जागेत हे भाजीपाला व्यावसायिक भाजीपाला व फळविक्रीचा व्यवसाय करीत होते. या सर्व व्यावसायिकांना पालिकेने ओळखपत्र दिलेले असून, त्या जागेचे भाडे हे व्यावसायिक भरत होते.
२ ही कारवाई करण्यापूर्वी आम्हाला कोणतीही आगाऊ सूचना दिलेली नव्हती. ज्यामुळे हजारो रुपयांचा खरेदी केलेल्या मालाचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या कारवाईने कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा गंभीर प्रश्न आपल्यापुढे निर्माण झाला आहे, अशी व्यथा या वेळी व्यावसायिक व्यक्त करीत होते.