गवे, हरणांच्या वावरानंतर वनखाते-पोलिसांची हातमिळवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:12 AM2020-12-31T04:12:39+5:302020-12-31T04:12:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मानवी वस्तीत वन्य प्राणी आल्यास त्याला पुन्हा नैसगिक अधिवासात जाण्यासाठी करावयाच्या उपाय योजनेत पोलिसांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मानवी वस्तीत वन्य प्राणी आल्यास त्याला पुन्हा नैसगिक अधिवासात जाण्यासाठी करावयाच्या उपाय योजनेत पोलिसांची भूमिका काय असली पाहिजे, या संदर्भात करावयाच्या बाबींबाबत बुधवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. वनप्राण्याबाबत घेण्याच्या काळजीबाबत पोलीस ठाण्याच्या पातळीवर जागृती निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांसाठी मार्गदर्शन शिबीर घेण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.
वनविभागाचे प्रधान मुख्य सरंक्षक सुयश दोडल, उपवनसरंक्षक (वन्य जीव) एस. रमेशकुमार, उपवनसरंक्षक राहुल पाटील, वाईल्ड लाईफचे समन्वयक अनुज खरे आदी यावेळी उपस्थित होते. शहर पोलीस दलाच्या ‘क्राईम मिटिंग’मध्ये वन विभागाच्या या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. पोलिस आयुक्त गुप्ता यांच्यासह सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे तसेच अन्य वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोथरुड आणि बावधन येथे रानगवे मानवी वस्तीमध्ये आल्याच्या घटना घडल्या. त्यात कोथरुडमधला गवा गोंधळ आणि गर्दीमुळे प्राणास हकनाक मुकला. त्यामुळे या परिस्थितीत काय काळजी घ्यावी, यासाठी पोलिस आणि वन खात्यात समन्वय असणे आवश्यक आहे. मानवी वस्तीत आलेल्या या प्राण्यास त्याच्या मुळ अधिवासात परत जाण्यासाठी काय करावे, नागरिकांना त्या भागातून दूर कसे ठेवावे, याविषयी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.