'वनविभाग झोपला अन् बिबट्या मात्र जागा', भविष्यात पुण्यात बिबट्यांचा धुमाकूळ माजणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 06:43 PM2021-10-28T18:43:26+5:302021-10-28T18:44:15+5:30
वन्यजीव धोरण कधी होणार, वन्यजीव-मानव संघर्ष रोखण्यासाठी उपाययोजना काय करणार ?
श्रीकिशन काळे
पुणे : बिबट्यांचा अधिवास नसताना ते उसामध्ये आता चांगले स्थिरावले आहेत. उसाची शेती वाढतेय तशी बिबट्यांची संख्याही वाढली आहे. आता तर पुणे शहराकडे बिबट्याने मोर्चा वळवला आहे. अशा वेळी मानव - बिबट संघर्ष अटळ आहे. बिबट्यांच्या संख्येवर आणि हल्ल्यांवर वन विभाग काहीच उपाय करत नाहीत. त्यासाठीचा आराखडाच तयार केलेला नाही. कारण वन विभाग झोपलेला आहे आणि बिबट्या मात्र जागा आहे.
नैसर्गिक अधिवासातून बिबट्याने कधीच पळ काढून उसाची शेती आता अधिवास केला आहे. एका वेळी तीन - तीन बछडे जन्माला येत असल्याने त्यावर नियंत्रणच नाही. फुरसुंगी परिसरात, दिवे घाटात येणारा बिबट्या आता साडेसतरा नळी म्हणजे खूप दाट वस्ती असलेल्या भागात शिरकाव करत आहे. आताच योग्य धोरण ठरवले नाही, तर भविष्यात शहरात बिबट्यांचा धुमाकूळ माजणार आहे.
माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोळकर म्हणाले, गेली अनेक वर्षे झाली, वन्यजीव धोरणाची मागणी केली जात आहे. पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. सध्या बिबट्यांचा वावर सोलापूर, बार्शी, बीड, उस्मानाबाद परिसरातही होत आहे. कारण उसाची शेती वाढली आणि त्यात बिबट्यांची संख्याही वाढत आहे. हे रोखायचे असेल तर ठोस धोरण हवे.''
गावांभोवती स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक
''शहराभोवती लोकं कचरा टाकतात. त्याने कुत्री, डुक्करं वाढतात आणि याकडे बिबटे आकर्षित होतात. म्हणून ते शहरालगतच्या परिसरात शिरकाव करत आहेत. गावांभोवती स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा बिबट्यांचे हल्ले वाढतच जातील. बिबटे नैसर्गिक अधिवास सोडून इतर ठिकाणी दिसले तर काय करायचे याचे धोरण नक्की हवे. अधिवासात नसतील तर तिथे त्यांना मारायचे की, पकडायचे यावर ठोस निर्णय व्हायला हवा असे माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोळकर यांनी सांगितले.''
बिबटे नसबंदीचे झाले काय?
काही वर्षांपुर्वी बिबट्यांची नसबंदी करण्याची घोषणा मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी केली होती. परंतु त्यानंतर यावर काहीच घडामोड झाली नाही. केवळ तात्पुरती घोषणा करून वन विभाग गप्प बसले आहे. वन विभागाकडून बिबट-मानव संघर्षावर ठोस काही तरी काम व्हायला हवे. अन्यथा आज नागरिकांचा हात जखमी झाला आहे, उद्या जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असेल ?