आंबेगाव तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 02:09 PM2021-02-02T14:09:41+5:302021-02-02T14:09:56+5:30
वनविभागामार्फत चार दिवसांपूर्वी या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता,
आंबेगाव : ढोबळेवाडी (ता.आंबेगाव) परिसरात जनावरांवर वारंवार हल्ले करणाऱ्या करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे.गेल्या काही दिवसात शेतातील पाळीव प्राण्यांवर हल्ले करून या बिबट्याने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे वन विभागातर्फे बिबट्याला पकडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. अखेर मंगळवारी पहाटे या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.
भीमाशंकर कारखान्याचे संचालक रामचंद्र जयराम ढोबळे यांचे घर डोंगराच्या कडेला आहे. या परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर आहे, ढोबळे यांच्या शेळयांवर आत्तापर्यंत तीन वेळा हल्ले करून तीन शेळ्यांची करडे बिबट्याने फस्त केली तर एक वेळ लहान मुलांवर बिबट्या धावून गेला होता. त्यामुळे परिसरात झालेले या घटनेची दखल घेऊन वनविभागामार्फत चार दिवसांपूर्वी या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. आज 2 फेब्रुवारी रोजी पहाटे च्या सुमारास बिबट्या पिंजर्यात अडकून जेरबंद झाला आहे. यामुळे ढोबळे मळा परिसरातील नागरिकांनी बिबट्याच्या भीतीतून सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला धामणी वनविभागाचे वनपाल एस,एस भैच्चे, वनाधिकारी सोपान अनासुने यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला वाहनातून माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्र येथे नेण्यात आले आहे.