बिबट्यापुढे वन विभागाचेच हात बांधलेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 04:21 AM2017-07-21T04:21:21+5:302017-07-21T04:21:21+5:30
शिरुर तालुक्यामध्ये बिबट्या मोकाट फिरत असताना वन विभागाचे मात्र हात बांधलेले असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. वन विभागाकडे लेपर्ड रेस्क्यू टीमच
- सुनील भांडवलकर । लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : शिरुर तालुक्यामध्ये बिबट्या मोकाट फिरत असताना वन विभागाचे मात्र हात बांधलेले असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. वन विभागाकडे लेपर्ड रेस्क्यू टीमच नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे बिबट्यांचा मानवी वस्त्यांमधील शिरकाव वाढू लागल्याचे चित्र आहे.
शिरुर तालुक्यात वढु बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात रतन भंडारे यांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली होती, याआधीही अशाच प्रकारचा हल्ला करित बिबट्याने मानवी वस्तीत शिरकाव करण्यास सुरुवात केल्याने स्थानीक नागरिक व वन विभाग यांच्यात संघर्ष वाढला असुन वनविभागाकडे बिबट्या पकडण्यासाठी लेपर्ड रेस्क्यु टीम तर नाही.
शिवाय बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी इन्फारेड कॅमेरेही नसल्याने वनविभागाच्या हातात पिंजरा लावणे व हल्यातील मृत अथवा जखमींना मदत देण्यापलीकडे कोणतेच काम राहिले नसल्याची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे.
पुणे जिल्ह्यात पूर्वी जुन्नर-आंबेगाव क्षेत्रातच बिबटे पाहण्यास मिळत होते. मात्र ९०च्या दशकात जिल्ह्यात धरणे बांधण्यात आल्याने नद्यांना बारमाही स्वरुप प्राप्त झाले. त्यातच चासकमान , भामा आखेड , भीमा नदी , चासकमान कालवे , यामुळे शिरुर तालुक्याला पाण्याच्या बाबतीत मुबलकता आली. पाणी व खाद्य या भागात भरमसाठ मिळु लागल्याने रानडुक्कर , कुत्री , शेळळ्या मेंढ्या वासरे यासारखी प्राण्यांची संख्यापण वाढल्याने व बिबट्याला जुन्नर- आंबेगाव परिसरात आपल्या खाद्याची उणीव यामुळे बिबट्याने आपली कक्षा शिरुर तालुक्यापर्यंत वाढवली.
बिबट्याला त्याचे खाद्य व पाणी कोणतेही कष्ट न करता मिळत असल्याने या भागात बिबट्याने आपले साम्राज्य तर उभे केले आहेच शिवाय त्याचा भ्रमण करण्याचा मार्गही वाढला आहे.
भीमा नदी तिरावर वढु बुद्रुक , आपटी , कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी , धानोरे, दरेकरवाडी, भीमाशेत, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, नागरगावच, रांजणगाव सांडस, वडगाव रासाई , मांडवगण फराटा , इनामगाव , कवठे येमाई परिसरात मोठ्याप्रमाणावर बिबट्यांनी गेली अनेक वर्षापासुन वास्तव्य करु लागला आहे.
वढु बुद्रुक व परिसरातील आठ-दहा गावांमध्ये बिबट्या असल्याबबात नागरिक तक्रारी करायचे मात्र वनविभाग टोलवाटोलवी करित तो प्राणी बिबट्या नसुन तरसच आहे असा न बघताच शिक्कामोर्तब करायचे त्यामुळे नागरिक व वनविभाग यांच्यात कायमच संघर्ष पाहण्यास मिळत होता. त्यानंतर २ मे रोजी वढु बुद्रुक येथे तरुणांना बिबट्याची तीन बछडे दिसली होती.
त्यात दोन मध्यम वयाची व एक नवजात बिबट्याचा बछडा होता. तरुणांनी पाठलाग करुन एका लहान बछड्याला पकडल्यानंतर या भागात प्राण्यांवर हल्ला करणारा प्राणी हा बिबट्याच आहे यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. वढु बुद्रूक या परिसरातच पाच-ते सहा बिबटे असल्याची माहिती नागरिक देत आहेत.
त्याचबरोबर धानोरे, भीमाशेत, विठ्ठलवाडी याठिकाणीही चार ते पाच बिबटे असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तालुक्यात बिबट्यांची संख्या जवळपास वीस पेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बिबट्याला पकडणार तरी कसे?
बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी ब्लो पाईप , न्युमॅटिक गन व अन्य साधन सामग्री असणे आवश्यक आहे , अन्यथा पिंजरा लावणे व हल्यातील मृत पाळीव प्राण्यांची नुकसान भरपाई देण्यापलीकडे वनविभागाला करण्यासारखे काही नाही.
शिरूर तालुक्याच्या दीड लाख हेक्टर क्षेत्रासाठी फक्त २५ वन कर्मचारी
शिरुर तालुक्यातील ११६ गावांमधील १ लाख ५५ हजार ८११ हेक्टर एवढ्या मोठ्या क्षेत्रासाठी वनविभागाचे फक्त २५ वन कर्मचारीच कार्यरत असल्याने बहुतांश वेळा बिबट्याने उच्छांद मांडुनही वनकर्मचारी बिबट्याचीच कातडी वाचवित हल्ला करणारा प्राणी हा बिबट्या नसुन तरस असल्याचा
जावई शोध लावतानाही पाहन्यास मिळत आहे.
माणसापेक्षा बिबट्या महत्त्वाचा का?
बिबट्याने माणसावर हल्ला केला तरी चालेल; पण माणसाने बिबट्यावर हल्ला करून बिबट्या मारला तर सहा वर्षांची सजा; म्हणजे माणसापेक्षा बिबट्या महत्त्वाचा आहे का? असा सवाल वृद्ध ग्रामस्थ रघुनाथ भंडारे यांनी केला.
जखमीला दोन महिन्यानंतरही मदत नाही : ६ मे रोजी वढु बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या रतन भंडारे या वृध्द नागरिकाला दोन महिन्यानंतरही अद्याप नुकसान भरपाई तर मिळालीच नाही शिवाय भंडारे यांच्या डोक्याला बिबट्याने घेतलेला चाव्याची वेदना अजुनही त्रस्त करित असुन त्यांना वरचेचर दवाखान्यातही पदरमोड करुन न्यावे लागत असल्याने वनविभागाच्या अशा कारभाराबाबत नागरिक टिका करु लागले आहेत. शिवाय बिबट्याच्या हल्यात मृत झालेल्या शेळळ्या , मेंढ्या , घोड्याचे पिल्लु , वासरे यांच्याही नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाहि.
- गेल्या दोन ते तीन महिन्यात वढू बुद्रुक येथिल दोन नागरिकांवर हल्ले चढविले आहे. बिबट्याला प्रतिकार झाल्याने बिबट्याने पळ काढला म्हणुन त्या नागरिकांच्या जिव वाचला आहे. बिबट्या नागरी वस्तीत येवु लागल्याने वनविभागावरची आता ख-या अर्थान जबाबदारी वाढली आहे. बिबट्याने आता हिंस्त्र रुप धारण केले असल्याने बिबट्याला पकडन्यासाठी वनविभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही ही वस्तुस्थिती आहे.
वन विभागातर्फे गस्ती पथक
शेतक-यांनी रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने न जाता समुहाने जावे , शेतात जाताना सोबत फटाके किंवा मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी लावावीत , हातात काठी व बॅटरी असावी , महिलांनी शेतात काम करताना विरुध्द दिशेकडे तोंड करुन काम करावे जेणे करुन बिबट्याची हालचाल लक्षात येईल अशा सुचना करतानाच बिबट्याच्या हल्यांसधर्भात नागपुर कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात आल्याचे वनअधिकारी तुषार ढमढेरे यांनी सांगत तालुक्यात शिरुर वनविभागाच्या स्तरावर गस्ती पथक सुरु केले असल्याचेही त्यांनी सांगितले.