विरोधकांना महागाईबाबत काही देणे-घेणे नाही : सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 05:25 PM2023-02-08T17:25:03+5:302023-02-08T17:25:32+5:30
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बुधवारी (दि. ८) बारामती दौऱ्यावर...
बारामती (पुणे) : विरोधकांना महागाईबाबत काही देणे-घेणे नाही म्हणून ते महापुरुषांच्या नावाने राजकारण करत आहेत. महागाई आहे तर त्याबाबत विधानसभेत विषय मांडता येतो. विधानसभेत योग्य चर्चा घडवता येते, या शब्दात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बुधवारी (दि. ८) बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी येथील कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी विविध प्रकल्पांची व शेती विषयक माहिती घेतली. त्यांच्या समवेत कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारने रडीचा डाव खेळू नये असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, किरीट सोमय्या असो वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा आदित्य ठाकरे असो, कोणावरही असा प्रकार होता कामा नये. मात्र असे प्रकार करणारे कोण आहेत, हे बघितले पाहिजे. पुण्यात सोमय्या गेले होते तेव्हा कोणी केला होता रडीचा डाव? आपण जेंव्हा तत्त्वज्ञान सांगतो तेव्हा आपल्यापासून त्याची सुरुवात केली पाहिजे,अशी अपेक्षा आहे. नाही तर लोक राजकीय नेत्यांना ढोंगी समजतील असे म्हणत त्यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या हितासाठी बारामतीसारखे कृषी प्रदर्शने चंद्रपूर मध्येही आयोजित केले पाहिजे म्हणून आज मी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र पाहण्यासाठी आलो, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी यांनी दिली.
मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने राज्य थांबले नाही...
मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राज्य चालायचे थांबले का. असा प्रति सवाल करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही एक वर्ष झाल्याच नाही. म्हणून काय काम थांबले आहे का...? मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही म्हणून राज्य अधोगतीकडे चालले आहे. प्रगती थांबली असे नाही अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.. त्याची यादी मी देऊ शकतो असेही मुनगंटीवार म्हणाले...
शेतकरी होणार वीज उत्पादक...
अनेक राज्यांनी शेतकऱ्यांना मोफत सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, पंजाब सरकारने शेतकऱ्यांना जेव्हा मोफत वीज दिली होती त्यानंतर त्या राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली. वीज मोफत देण्याऐवजी महाराष्ट्र सरकार सौर ऊजेर्चा वापर केला. तर शेतकऱ्यांना अल्प दरात वीज मिळू शकते. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पन्नास हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामधून शेतकरीच वीज उत्पादक होऊ शकेल असा हा प्रकल्प असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.