Pune Crime: टेम्पो साेडविण्यासाठी लाच घेताना वनपरिमंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात
By विवेक भुसे | Published: October 13, 2022 02:24 PM2022-10-13T14:24:37+5:302022-10-13T14:30:23+5:30
प्रविण क्षीरसागर हा वन परिक्षेत्र अधिकारी शिरुर प्रादेशिक कायार्लयाच्या अंतर्गत नेमणुकीला...
पुणे : झाडे तोडून वाहतूक करताना पकडलेला टेम्पो सोडण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वन परिमंडळ अधिकाऱ्याला पकडले. प्रविण अर्जुन क्षीरसागर (वय ४०, रा. सावतामाळीनगर, शिरुर) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. क्षीरसागर हा वन परिक्षेत्र अधिकारी शिरुर प्रादेशिक कायार्लयाच्या अंतर्गत नेमणुकीला आहे.
याबाबत ४३ वर्षाच्या ठेकेदाराने तक्रार केली आहे. तक्रारदार हे झाडे तोडणारे ठेकेदार आहेत. त्यांनी कुरुळी ते वडगाव रासई दरम्यानचा झाडे तोडण्याचा ठेका घेतला आहे. ठेका घेतलेली झाडे तोडून तिची टेम्पोने वाहतूक करीत असताना प्रविण क्षीरसागर याने टेम्पो ताब्यात घेतला होता. तक्रारदार यांनी जुन्नर कार्यालयात जाऊन ८ हजार रुपयांचा दंड भरला व ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर घोषणापत्र लिहून दिले. त्यानंतर ते ११ ऑक्टोबर रोजी शिरुर वन कार्यालयात टेम्पो सोडवून घेण्यासाठी आले होते. प्रविण क्षीरसागर याने टेम्पो साेडण्यासाठी व पुन्हा कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिरुर वन कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना क्षीरसागर याला पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली असून पोलीस निरीक्षक भारत साळुंखे तपास करीत आहेत.