मेंढपाळांकडून वनकर्मचाऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:29+5:302021-06-19T04:08:29+5:30
वासुंदे : हिंगणीगाडा येथील वनक्षेत्रात मेंढ्यांना चारण्यासाठी विरोध केल्याने दोन वनकर्मचाऱ्यांना मेंढपाळांनी मारहाण केली असून, याप्रकरणी चार मेंढपाळांवर ...
वासुंदे : हिंगणीगाडा येथील वनक्षेत्रात मेंढ्यांना चारण्यासाठी विरोध केल्याने दोन वनकर्मचाऱ्यांना मेंढपाळांनी मारहाण केली असून, याप्रकरणी चार मेंढपाळांवर पाटस पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती, पाटस पोलीस चौकीचे उपपोलीस निरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली.
गुरुवार दि. १७ रोजी हा प्रकार घडला असून याप्रकरणी रामा तांबे, लखन खडके, गणपत खडके (रा. पाटस (मोटेवाडा, ता. दौंड, जि. पुणे) व नामा कटरे (रा. कोराळी, ता. बारामती) या मेंढपाळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंगणीगाडा येथील वनक्षेत्रात कामावर असलेले वनकर्मचारी बाबासाहेब कोकरे व अरुण बापूराव मदने यांना वनक्षेत्रात दोन ते अडीच हजारांच्या आसपास मेंढ्यांचा कळप चरण्यासाठी आल्याचे दिसून आल्यानंतर हे वनविभागाचे क्षेत्र असून, मेंढ्यांना चारण्यासाठी आणून नका, याठिकाणी नुकतेच लागवड केलेल्या झाडांचे नुकसान होत आहे, असे समजून सांगितले. मात्र, मेंढ्यांना चारण्यासाठी विरोध केल्याने या मेंढपाळांनी या वनकर्मचाऱ्यांना काठी व हातापायांनी मारहाण केली.
याबाबत वनकर्मचाऱ्यांनी पाटस पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने या चार मेंढपाळांवर शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र, हा प्रकार अत्यंत गंभीर असून संबंधित मेंढपाळांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, दौंड वनविभागातही संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-सचिन रगतवान, वनपरिक्षेत्र अधिकारी, दौंड