माणसं नव्हे पक्षी तयार करता जंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:10 AM2021-05-10T04:10:33+5:302021-05-10T04:10:33+5:30
पुणे : पक्षी का वाचवायचे असतात, तर ते जंगलं निर्माण करतात म्हणून. ते अनेक बिया खातात. त्यांच्या पोटातील पाचक ...
पुणे : पक्षी का वाचवायचे असतात, तर ते जंगलं निर्माण करतात म्हणून. ते अनेक बिया खातात. त्यांच्या पोटातील पाचक रस त्या बियांना चिकटतो आणि त्या बिया विष्ठेतून बाहेर पडतात. त्या मातीत चांगल्या रुजतात आणि त्यामुळे झाडे वाढतात. अशा प्रकारे अनेक जंगले हे पक्षी तयार करतात, माणसं जंगल निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांचे या निसर्गातील स्थान महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले.
इन्वॉयरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेतर्फे दर शनिवारी पर्यावरणीय वेबिनार आयोजित केले जाते. त्यामध्ये पक्षितज्ज्ञ डॉ. किरण पुरंदरे यांचे ‘नागझिरा जंगलातून’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी या वेळी नागझिरा जंगलातील पक्ष्यांविषयीची माहिती आणि त्यांचे आवाज काढून दाखवले. वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य अनुज खरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
पुरंदरे म्हणाले, ‘‘नागझिऱ्याच्या जंगलात सुमारे ३०० प्रकारचे पक्षी दिसतात. राज्यातील पक्ष्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक पक्षी या जंगलात आहेत. या पक्ष्यांना जंगलात पाहणे आनंददायी क्षण असतो. कोणताच पक्षी किंवा प्राणी पिंजऱ्यात ठेवू नये. त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. अनेक तारांकित पोपट पिंजऱ्यात ठेवले जातात.’’
——————————-
सहा झाडे महत्त्वाची
पुणे, सोलापूर, सातारा रस्त्यावर पूर्वी वडाची झाडे होती. ती तोडली गेली. पळस, पांगारा, काटेसावर, वड, पिंपळ, उंबर ही झाडे महत्त्वाची आहेत. अन्न, फळं देणारी आहेत. ती लावली पाहिजे. पक्षी, प्राण्यांना ही झाडे फळे देतात. त्यामुळे या वृक्षांना वटवृक्ष, आधारवड असे संबोधले जाते.
------------
माळरानांवर वृक्षारोपण चुकीचे
माळरानांवर वृक्षारोपण केले आहे. हे चुकीचे आहे. कुठं झाडं लावायची ते समजले पाहिजे. निसर्ग संवर्धन करण्यासाठी तो समजून घेतला पाहिजे. तरच त्याचे संरक्षण करता येईल. पण आपण काहीच करायचे नाही, हा एक चांगला मार्ग आहे. निसर्ग स्वत:चे संवर्धन स्वत: करतो. त्यात आपले नाक खुपसू नये.
- डॉ. किरण पुरंदरे, पक्षितज्ज्ञ
-------------
सह्याद्रीचे बनली बेटे
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेकजण जागा घेऊन घरं बांधत आहेत. आपण मिळून सह्याद्रीची ‘वाट’ लावली. सह्याद्रीची बेटे झाली आहेत. स्थानिक लोकांना विश्वास घेऊन निसर्ग संवर्धन करायला हवे, सह्याद्री वाचवायला हवा, अशी भावना पुरंदरे यांनी व्यक्त केली.