बनावट सही ठाेका, पालिकेची तिजाेरी लुटा; संगनमताने मारला पाच काेटींवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 02:47 AM2021-01-25T02:47:12+5:302021-01-25T02:47:28+5:30
मलनिस्सारण विभागाच्या प्रकल्प विभागाने, संबंधित ठेकेदाराला शहरात ठिकठिकाणी मलवाहिन्या टाकण्याचे ५६ कोटी ५७ लाखाचे कंत्राट २०१७ साली दिले आहे.
दीपक मुनोत
पुणे : महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणेपाच कोटी रुपये अदा करण्यात आल्याचा गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांसह काही वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने हा गैरप्रकार झाल्याची चर्चा आहे.
पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प विभागामध्ये हा घोटाळा झाला आहे. या विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता संदीप खांदवे हे ३१ ऑगस्ट, २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा पदभार, कार्यकारी अभियंता सुश्मिता शिर्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात आला. त्यानंतर, सुमारे तीन महिन्यांनंतर २७ नोव्हेंबर, २०१९ रोजी अधिकाऱ्यांनी संगनमताने खांदवे यांचीच हुबेहूब बनावट स्वाक्षरी करून ʻपाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडʼ या ठेकेदाराला, ४ कोटी ८८ लाख २४ हजार ५०५ रुपयांचे बिल परस्पर अदा करून टाकले. खांदवे यांनी ʻती’ सही आपण केली नसल्याचे ʻलोकमत’ शी बोलताना सांगितले.
मलनिस्सारण विभागाच्या प्रकल्प विभागाने, संबंधित ठेकेदाराला शहरात ठिकठिकाणी मलवाहिन्या टाकण्याचे ५६ कोटी ५७ लाखाचे कंत्राट २०१७ साली दिले आहे. त्यानुसार, शहरातील सुमारे ५१ किलोमीटर लांबीच्या नदीनाल्यांमध्ये ३६ ठिकाणी मैलापाणी हे बंदिस्त नलिकांद्वारे जवळच्या मैलापाणी शुद्धिकरण केंद्रापर्यंत वाहून नेण्यात येणार आहेत. या कंत्राटातील, बारावे रनिंग बिल काढताना हा मोठा घोटाळा झाला आहे.
ʻत्या’ बिलावर मी सही केलेली नाही. महापालिकेच्या प्रदीर्घ सेवेत मी अत्यंत जबाबदारीने काम केले आहे. सेवानिवृत्तीनंतर तर अशी सही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. - संदीप खांदवे, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता
या प्रकरणात नेमके काय झाले आहे, त्याचा तपास सोमवारी महापालिकेत गेल्यावर पाहते. - उल्का कळमकर, मुख्य लेखापाल,
पुणे महापालिका