भिका-यांच्या पुनर्वसनाचा विसर
By admin | Published: April 4, 2015 06:00 AM2015-04-04T06:00:12+5:302015-04-04T06:00:12+5:30
शहरात चौकांचौकांमध्ये, सिग्नलला, रेल्वे स्थानक, बस थांब्यांवर हजारो भिकारी उघडपणे फिरत असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा
पुणे : शहरात चौकांचौकांमध्ये, सिग्नलला, रेल्वे स्थानक, बस थांब्यांवर हजारो भिकारी उघडपणे फिरत असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा विसर भिक्षेकरी स्वीकार केंद्राला पडलेला आहे. महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत लाखो रुपयांचा निधी या केंद्राला दिला जातो. मात्र, गेल्या वर्षभरात केवळ १८० भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन ११६ जणांचे पुनर्वसन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी अनास्थेमुळे केवळ भिक्षेकरी स्वीकार केंद्रांचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे.
फाटक्या कपड्यांंमध्ये लहान मुलांना घेऊन भिक मागणाऱ्या महिला, छोटी मुले यांना पाहून अनेकांना त्यांच्याविषयी दयेची भावना निर्माण होते. मात्र, दोन-चार रूपये त्यांच्या वाडग्यात टाकून हळहळत निघून जाण्याशिवाय ते काहीच करू शकत नाहीत. भिकाऱ्यांना वाईट पद्धतीने जगावे लागू नये म्हणून शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये भिक्षेकरी स्वीकार केंद्र सुरू केले आहे. महिला व बाल विकास आयुक्तालय तसेच पोलिस यांनी संयुक्तपणे भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे घडत नसल्याचे लोकहित फाऊंडेशनचे अजहर खान यांना मिळालेल्या माहितीतून निष्पन्न झाले आहे.
शहरात १५०० भिकारी कुटुंब आहेत. त्यांच्याकडे नागरिकत्त्वाचा कोणताही पुरावा नसल्याने शासनाच्या योजनेचा लाभ त्यांना मिळू शकत नाही. काही भिकाऱ्यांकडे मोठ्या रकमा आढळून आल्याचे प्रकार उजेडात आले.(प्रतिनिधी)