पावसाळी सहल विसरा, घरी बसा... अन्यथा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:08+5:302021-07-17T04:10:08+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर आठवड्यातील सातही दिवस पर्यटन बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर आठवड्यातील सातही दिवस पर्यटन बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला आहे. पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील गिरिस्थाने, किल्ले, धरण परिसर आणि धबधब्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात स्वतंत्र आदेश काढले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले की, अद्यापही जिल्ह्यातील पाॅझिटिव्हिटी दर अपेक्षित प्रमाणात कमी झालेला नाही. यामुळेच शहर आणि जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. शनिवार-रविवारची सुट्टी गाठून नागरिक सहकुटुंब, मित्रपरिवारासह पर्यटनस्थळी गर्दी करत आहेत. यातून कोरोना संसर्ग फैलावण्याची भीती असल्याने बंदी घालण्यात आली आहे.
चौकट
या तालुक्यात होते गर्दी
मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वसलेल्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धरणे, नद्या, गडकिल्ले, धबधबे, तलाव, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे तसेच थंड हवेची ठिकाणे आहेत. पावसाळ्यात या डोंगरदऱ्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी हजारो लोक जातात. या पर्यटनस्थळी सध्याच्या कोरोना काळात शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) पाळले जात नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.