Manoj Jarange Patil: पक्ष, वाद विसरून आम्ही सहभागी; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत ठाकरे गट - मनसे एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 03:03 PM2024-08-11T15:03:56+5:302024-08-11T15:04:15+5:30
मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व पक्ष या रॅलीत एकत्र आलो आहोत
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे, बैठका, सभा यांचे सत्र सुरू आहे. यातच मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. यावरून राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर विरोधक टीका करताना दिसत आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यांवर हल्ले झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये वाद पेटला. दोन्ही गटाच्या नेत्यांकडूनही जशास तसे उत्तर दिले जात आहे. अशातच पुण्यात मनोज जरांगे पाटीलांच्या शांतता रॅलीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्याचं दिसून आले आहे. आम्ही पक्ष, वाद विसरून समाजाचे काही देणं लागतो या उद्देशाने रॅलीत सहभागी झाले असल्याचे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांची आज सारसबागेसमोरून शांतता रॅली निघणार आहे. ही रॅली सारसबागेपासून बाजीराव रोडने जंगली महाराज रस्त्यावरून डेक्कनला समारोप करणार आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. तसेच ठिकठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त देखील ठेवला आहे. राज्यामध्ये सर्वत्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) जरांगे पाटील जनजागृती शांतता फेरी काढत आहेत. सारसबागेच्या चौकातही मोठमोठे फलक लावले असून, भगवे झेंडे पहायला मिळत आहेत. तसेच डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याभोवती फुलांची सजावट करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मराठा बांधव हळूहळू सारसबागेसमोर जमा होत आहेत.
या शांतता रॅलीत पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे आणि मनसेचे राज्याचे सचिव आशिष साबळे हे एकत्र रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी विशाल धनवडे म्हणाले, आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली होत आहे. पुणे शहरातील सर्व पक्षांचे राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत. पाटलांना पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आहोत म्हणून आम्ही या ठिकाणी आलो असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
साबळे म्हणाले, आज समाजासाठी आम्ही पक्ष, वाद सगळं विसरून समाजाचे आम्ही काही देणं लागतो. या उद्देशाने सगळे जण एकत्र आलो आहोत. जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला पाठिंबा देण्यासाठी एक मराठा लाख मराठा म्हणून आम्ही सुद्धा या रॅलीत सहभागी झालो आहोत.