माफ करा अन् पुढे जा; माहीने उलगडले तणावमुक्त जीवनाचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:23 IST2025-02-20T19:22:56+5:302025-02-20T19:23:55+5:30
धोनी आता चेन्नई संघाकडून एक खेळाडू म्हणून कदाचित अखेरच्या आयपीएल सत्रात खेळण्यासाठी तयारी करत आहे

माफ करा अन् पुढे जा; माहीने उलगडले तणावमुक्त जीवनाचे रहस्य
- उमेश जाधव
मुंबई : कठीण असले तरीही माफ करा आणि पुढे जा, असे सांगत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने तणावमुक्त जीवनाचे रहस्य उलगडले. अन्य लोक आपल्याबाबत काय विचार करतात याची काळजी करण्यात आपली रात्रीची झोप वाया घालवत नाही.
याबाबत मी निश्चिंत असल्याचेही धोनीने सांगितले. आपल्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा ४३ वर्षीय माजी यष्टीरक्षक फलंदाज धोनीला दिग्गज खेळाडूंपैकी मानले जाते. त्याने मैदानावर आपल्या शांत आणि एकाग्र दृष्टीकोणाद्वारे नेतृत्व करणाऱ्यांसाठी उच्च मानक स्थापित केले आहे.
धोनी आता चेन्नई संघाकडून एक खेळाडू म्हणून कदाचित अखेरच्या आयपीएल सत्रात खेळण्यासाठी तयारी करत आहे. एका चाहत्याने सल्ला मागितल्यावर त्याने तणावमुक्तीवर वक्तव्य केले.‘धोनी“ ॲप सादर करताना महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, आयुष्य साधे ठेवण्यावर माझा विश्वास आहे. स्वत:प्रती प्रमाणिक रहावे, लोक तुमच्यासाठी जे करत आहेत त्यासाठी त्यांचे आभार माना. नेहमी हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा विचार करून अधिकची मागणी करू नका.
यावेळी भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन हादेखील उपस्थित होता. धोनी म्हणाला की, मला माहिती आहे की ॲप थोडे अधिक असे म्हणते. पण संपूर्ण गोष्ट कृतज्ञता बाळगणे, धन्यवाद म्हणणे, मोठ्यांचा आदर करणे आणि लहानांना प्रेम देणे याबद्दल आहे.
चेहऱ्यावर स्मित ठेवा..!
धोनी म्हणाला की, कोणतीही परिस्थिती असली तरी चेहऱ्यावर स्मित ठेवा. समस्या आपोआप दूर होईल. असे करणे कठीण असले तरीही तुमच्यात लोकांना माफ करण्याची शक्ती असायला हवी. अनेक लोकांमध्ये ही क्षमाशक्ती नसते.