प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापायचे विसरले
By admin | Published: March 5, 2017 04:38 AM2017-03-05T04:38:38+5:302017-03-05T04:38:38+5:30
इयत्ता बारावीच्या जनरल फाउंडेशन या विषयाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत एक गुणांचा प्रश्न छापण्याचे राहून गेल्याचे समोर आले आहे. मराठी माध्यमाच्या
पुणे : इयत्ता बारावीच्या जनरल फाउंडेशन या विषयाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत एक गुणांचा प्रश्न छापण्याचे राहून गेल्याचे समोर आले आहे. मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत मात्र हा प्रश्न छापण्यात आलेला आहे. दरम्यान, याबाबत समन्वय समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले.
‘एमसीव्हीसी’चा ‘जनरल फाउंडेशन कोर्स पेपर २ ची ४० गुणांची परीक्षा शनिवारी झाली. या विषयाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नक्रमांक १ (अ) मध्ये चार गुणांचा ‘रिकाम्या जागा भरा’ असा प्रश्न होता. त्यात प्रत्येकी एक गुण याप्रमाणे चार प्रश्न विचारणे अपेक्षित होते. मात्र तीनच प्रश्न छापण्यात आले आहेत. चौथा प्रश्नच नसल्याने विद्यार्थीही गोंधळून गेले. मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत मात्र चारही प्रश्न छापण्यात आले होते. या सर्व प्रकारामुळे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे एका गुणाचे नुकसान होण्याची भीती आहे. सिस्कॉम संस्थेचे राजेंद्र धारणकर यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. ही गंभीर चूक असून राज्य मंडळाने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, असे धारणकर म्हणाले.
दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले. समन्वय समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पाटील म्हणाले.