ऑनर किलींगच्या घटना राेखण्यासाठी कायदा करा ; नीलम गाेऱ्हे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 08:21 PM2019-05-09T20:21:14+5:302019-05-09T20:23:11+5:30
ऑनर किलींगच्या घटना राेखण्यासाठी विशेष कायदा करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
पुणे : ऑनर किलींगच्या घटना राेखण्यासाठी विशेष कायदा करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. तसेच समाजात प्रबाेधन करण्याची गरज असल्याचे देखील गाेऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.
अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ऑनर किलींगच्या अनेक घटना समाेर आल्या आहेत. 6 मेला निघाेज येथे मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने मुलीच्या कुटुंबियांनी समाजात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी नवविवाहितेला आणि पतीला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समाेर आला हाेता. तर याच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कौठा या गावामध्ये मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे पिडीत मुलीच्या पालकांनी तिला लग्न लावून देतो म्हणून बोलावून घेतले आणि तिचा खून केला.
त्यामुळे गाेऱ्हे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले असून त्यात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांमध्ये ऑनर किलींगच्या घटना राेखण्यासाटी कायदा करावा अशी मागणी केली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील ऑनर किलिंगच्या घटनेत सुमीत शिवाजीराव वाघमारे याची हत्या करण्यात आली होती. पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून यातील दोन आरोपींना जमीन मिळाला आहे. मृत सुमित यांची पत्नी हिच्या जीवितास धोका निर्माण झाल्याबाबत तिने मला दूरध्वनीवरून कळविले आहे. याघटनेत आरोपीची जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात याव्यात.
मंगळवेढ्यातील सलगर मध्ये अनुराधा बिराजदार या डॉक्टर मुलीने श्रीशैल्य बिराजदार यांच्याशी घरच्यांच्या विरुद्ध विवाह केले म्हणून अनुराधा हिच्या आई वडिलांनी हत्या दि. ०४ ऑक्टोबर, २०१८ रोजी केली. तर दुसऱ्याच दिवशी अनुराधा यांचे पती श्रीशैल्य याचा देखील खून झाला. याबाबत अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे. या घटनेतील आरोपींना देखील अटक करून कडक कारवाई करण्यात यावी.
पुणे येथे हिंजवडी येथे ही काल ऑनर किलिंगमधून तुषार पिसाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. याघटनेची चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी.
अशा मागण्या देखील करण्यात आल्या आहेत.