पुणे जिल्ह्यात 83 गट व 166 गणांची रचना; अधिसूचना जाहीर न झाल्याने संभ्रम कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 08:15 PM2022-01-31T20:15:33+5:302022-01-31T20:23:36+5:30
अधिसूचना जाहीर न झाल्याने संभ्रम कायम
सुषमा नेहरकर- शिंदे
पुणे : राज्य निवडणूक आयोग इलेक्शन मोडवर असून, महापालिकेनंतर आता दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या गट-गणांची प्रारुप रचना व नकाशे सादर करण्याच्या तोंडी सूचना जिल्हा प्रशासनाला दिली आहे. गेल्या दहा वर्षातील वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या गट-गणांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु या संदर्भातील अधिसूचना जाहीर न झाल्याने नक्की वाढीव 83 की कमी झालेल्या 73 नुसार गट-गण निश्चित होणार याबाबत संभ्रम कायम आहे.
जिल्हा परिषद गटांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला, परंतु या निर्णयाची अधिसूचना अद्यापही काढण्यात आलेली नाही. राज्यात सद्यस्थितीत एका जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त 75 आणि कमीत कमी 50 गट आहेत. त्यामध्ये वाढ करून जास्तीत जास्त 85 आणि कमीत कमी 55 गट तयार करण्याचा निर्णय शासनचा आहे. परंतु अधिसूचना काढण्यात आली नसल्याने जुन्या- नव्या निर्णया प्रमाणे गटांची संख्या निश्चित होणार याबद्दल अद्यापही संभ्रम आहे.
परंतु राज्य निवडणूक आयोगाने मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार 83 गट व 166 गण गृहीत धरून गट-गण प्रारूप रचना सादर करण्याच्या तोडी सूचना दिल्या. त्यानुसार प्रारुप रचना व नकाशे सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व प्रांत अधिका-यांना दिल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील निवडणुका घेण्यासाठी पात्र असलेल्या सुमारे तीनशे ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेला दिलेली स्थगिती उठवली असून , या प्रभाग रचना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यामुळे महापालिके पाठोपाठ आता जिल्हा परिषद गट-गण रचनेला देखील वेग येणार हे स्पष्ट झाले आहे.