माजी कृषी परिषद महासंचालकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:51+5:302021-05-28T04:09:51+5:30
पुणे: चॉकलेट आणि खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कृषी परिषदेच्या माजी महासंचालकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला ...
पुणे: चॉकलेट आणि खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कृषी परिषदेच्या माजी महासंचालकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही अदाने यांनी हा आदेश दिला.
मारुती हरी सावंत (वय ६५) असे कृषी परिषदेच्या माजी महासंचालकाचे नाव आहे. सावंत याला २०१५ मधील बाललैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या तो येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून त्याने अर्ज केला होता.
लहान मुलींना चॉकलेट, खाऊचे आमिष दाखवून त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचार केले. तसेच अश्लील व्हीडिओ दाखवून मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य त्यांनी केले.
सावंत यांच्या घरझडतीत सीडी, हार्ड डिक्स जप्त करण्यात आली होती. त्यामध्ये सुमारे साडेतीन हजार अश्लील व्हिडिओ मिळून आले होते. तसेच २० लिटर दारूची बाटली जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत या खटल्यात १४ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. कोरोना महामारी तसेच वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्याच्या कारणावरून व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या १२ मे २०१९च्या शिफारसीला अनुसरून तात्पुरता जामीन मिळावा म्हणून न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास विशेष सरकारी वकील प्रताप परदेशी यांनी विरोध केला. आरोपीचा अर्ज हा उच्च अधिकारी समितीच्या शिफारसीस अनुसरून नाही. आरोपी हा उच्च पदस्थ असल्याने व हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीस जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद ॲड. परदेशी यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.