पुण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेची पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण; डोक्यातून रक्ताच्या धारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 16:54 IST2023-03-15T16:46:27+5:302023-03-15T16:54:50+5:30
पीएमपी बसचालक यांना डोक्यातून रक्त येईपर्यंत मारहाण झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु

पुण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेची पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण; डोक्यातून रक्ताच्या धारा
धनकवडी : स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत असलेल्या पीएमपी बस चालकाला माजी नगरसेविका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त मारहाण केल्याची धक्कादायक घटना अभिनव चौकात सकाळच्या सुमारास घडली. शशांक देशमाने, वय ५२ रा. धनकवडी, बालाजीनगर, असे मारहाण करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. या मारहाणीत देशमाने यांना डोक्यातून रक्तयेई पर्यंत मारहाण झाली असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. हि घटना आज सकाळी ८.४५ च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी स्वारगेट डेपोतील पीएमपी बस स्वारगेट वरुन शिवाजीनगर चालली होती, चालक शशांक देशमाने यांचा मार्ग क्र २ वरती सकाळ पाळीत काम करत असताना अभिनव कॉलेज चौकात बस व कारचा किरकोळ अपघात झाला. त्या अपघातात कारचालक महिला आणि चालक यांच्यामध्ये किरकोळ वाद झाले. यावादातून महिलेने इतर ३ साथीदारांसह चालक देशमाने यांना जबर मारहाण केली. अपघात झालेल्या चार चाकी गाडीचा चालक आणि कारमधील इतर व्यक्ती हे भाजपचे माजी नगरसेवक असल्याचा असा दावा देशमाने यांनी केला आहे.