भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांची जामिनावर सुटका, गुंड गजा मारणे मदत प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 06:53 PM2021-04-21T18:53:22+5:302021-04-21T18:53:47+5:30
न्यायालयाने काकडे यांची २५ हजार रुपये रोख व १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिनावर सायंकाळी ५ वाजता सुटका केली.
पुणे : तळोजा तुरुंगातून सुटलेल्या गुंड गजानन मारणे याची भव्य मिरवणुक काढण्याच्या कटात सहभाग घेऊन गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी(दि. २१) सकाळी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. तेथे काही तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने काकडे यांची २५ हजार रुपये रोख व १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिनावर सायंकाळी ५ वाजता सुटका केली.
तळोजा कारागृहातून १५ फेब्रुवारी रोजी सुटल्यानंतर गुंड गजानन मारणे याची त्याच्या साथीदारांनी सुमारे २०० ते ३०० मोटारीच्या सहाय्याने भव्य मिरवणुक काढली होती. त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावरुन व्हायरल झाले होते. त्यानंतर गजानन मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणात २३ फेब्रुवारी रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष शाखेच्या सोशल मिडिया सेलचे पोलीस उपनिरीखक अनिल डफळ यांनी फिर्याद दिली होती. संघटित गुन्हेगारांना पडद्याआडून मदत केल्याच्या संशयावरुन गेल्या महिन्यात २३ मार्च रोजी पोलिसांनी संजय काकडे यांना पोलीस आयुक्तालयात बोलावून चौकशी केली होती. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली.
गजानन मारणे व त्यांचे समर्थकांची जनतेचे मनामध्ये दहशत राहावी, म्हणून कट करु युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मिडियाचे माध्यमातून सुनियोजन पूर्वक तळोजा जेल ते कोथरुड अशा वाहनांच्या ताफ्याचे व्हिडिओ व्हायरल करुन त्यावर कमेंट पोस्ट करुन पुण्यातील नागरिकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करुन त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होईल, असे वातावरण तयार करुन संबंधित केसमधील साक्षीदार व अन्यायग्रस्त तक्रारदारांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले होतो.
माजी खासदार संजय काकडे व गजानन मारणे यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने काकडे यांच्याकडे सखोल तपास करायचा आहे. या गुन्ह्याचा कट कोणत्या ठिकाणी रचला?, या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे?, या गुन्ह्याचा कट रचण्यामागे अटक आरोपीचा नक्की काय उद्देश आहे?, याबाबत काकडे यांच्याकडे तपास करायचा आहे. तसेच अटक आरोपींनी सोशल मिडियावर दहशत पसरविण्यासाठी कोणकोणत्या साथीदारांची मदत घेतली?, त्यांचा गुन्ह्याशी काय संबंध आहे?, याबाबत तपास करण्यासाठी काकडे यांना ५ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील एस. पी. सावंत यांनी केली.
त्यावर काकडे यांच्यावतीने अॅड. चिन्मय इनामदार आणि अॅड. विजयसिंग ठोंबरे यांनी बाजू मांडली. महापालिका निवडणुका जवळ आल्याने मागील निवडणुकीतील काकडे यांचा सहभाग पाहून केवळ राजकीय द्वेषापोटी हा खोटा गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई झाली आहे. काकडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन न करता त्यांना अटक करण्यात आली आहे. काकडे यांचा मारणेशी काहीही संबंध नाही, असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने काकडे यांचा जामीन मंजूर केला.
.........