काडेपेटी दिली नाही म्हणून माजी कॅप्टन बालींचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 08:53 PM2018-02-12T20:53:21+5:302018-02-12T20:53:33+5:30

सिगारेट पेटविण्यासाठी काडेपेटी दिली नाही, म्हणून झालेल्या वादावादीत माजी कर्नल रवींद्रकुमार बाली यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

The former Captain Balinese murdered murderer did not give him the box office | काडेपेटी दिली नाही म्हणून माजी कॅप्टन बालींचा केला खून

काडेपेटी दिली नाही म्हणून माजी कॅप्टन बालींचा केला खून

Next

पुणे : सिगारेट पेटविण्यासाठी काडेपेटी दिली नाही, म्हणून झालेल्या वादावादीत माजी कर्नल रवींद्रकुमार बाली यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. रॉबीन सन ऊर्फ रॉबीन अ‍ॅन्थोनी लाझरस (वय २१, रा. कलनल, तारापूर रोड, दस्तुर बॉईज हायस्कूलसमोर, कम्प) असे त्याचे नाव आहे. रॉबीनसन याच्याविरुद्ध यापूर्वी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याबाबतची माहिती अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, पोलीस निरीक्षक सीताराम मोरे यांनी दिली. भारतीय लष्करात कॅप्टन म्हणून सेवा केलेल्या आणि कौटुंबिक कारणामुळे कॅम्प भागातील पदपथावर दिवस काढण्याची वेळ आलेल्या रवींद्रकुमार बाली (वय ६५, रा. कोयाजी रोड) यांच्यावर १ फेब्रुवारीला रात्री पावणेबारा वाजता डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट ३ कडील अधिकारी व कर्मचा-यांनी लष्कर भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता एक संशयित घटनास्थळापासून मंगलविहार, वंडरलँडच्या बोळातून, एम. जी. रोड व त्यानंतर टोराटोरा हॉटेलच्या शेजारील बोळातून नाज चौकातून, हॉटेल अरोरा टॉवर या ठिकाणाहून पळत जात असल्याचे निष्पन्न झाले. खून करणारा हाच संशयित असल्याची शक्यता धरून त्यानुसार तपास करीत असताना रॉबीनसन हा त्या दिवसापासून फरार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम मोरे यांना रॉबीनसन हा पनवेलमधील तळोजामधील पेंदर येथे असल्याचे समजले़ त्यानुसार रॉबीनसन याला पोलिसांनी पकडले. त्याने गुन्हा कबूल केला.

रॉबीन व त्याचा मित्र कुणाल मोरे हे त्या दिवशी संध्याकाळी केदारी पेट्रोल पंपाजवळून दारू घेऊन ओल्ड नाईन्टी नाईनजवळील टेकडीवर दारू पित बसले होते. तेव्हा त्यांचा मित्र अक्षय कांबळे, तेजस मोरे, राज कांबळे असे तिघे तेथे आले. त्यांनी दारू पिऊन झाल्यावर घरी जाण्यासाठी निघाले असता रॉबीनची गाडी बंद पडली म्हणून कुणाल मोरे याने त्याचा भाऊ तेजस मोरे याला त्याची गाडी घेऊन बोलावले. त्याप्रमाणे तेजस आला. 

तेजसच्या गाडीवर तिघे जण व कुणाल मोरे व राबीन यांच्या गाडीवरुन महंमदवाडी येथून निघून रॉबीनच्या घरी येत होते. रात्री साडेअकरा वाजता मंमादेवी चौकात पेट्रोल संपल्याने गाडी बंद पडली. गाडीस कुणाल हा धक्का मारत व रॉबीन मागून चालत घराकडे जात होते. त्यावेळेस रॉबीन याला सिगारेट ओढायची होती. त्याने कोयाजी रोडवर तंबूत झोपलेल्या रवींद्रकुमार बाली यांनी उठविले व त्यांच्याकडे काडेपेटी पाहिजे, असे सांगितले. बाली यांनी काडेपेटी दिली नाही़ तेव्हा त्यांच्या झटापट होऊन मारामारी झाली. त्या भांडणामध्ये रॉबीन याने रस्त्याचे जवळच असणारा सिमेंटचा ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यात दोन तीन वेळा मारला, ते जागेवरच कोसळले. तेव्हा कुणाल मोरे याने रॉबीनला पथ्तर से मत मारो, झगडा मत करो, लफडा हो जाएगा असे म्हणून कुणाल गाडी घेऊन सरळ पळत गेला. त्यानंतर रॉबीनही तेथून पळून गेला. त्याने कोणीही ओळखू नये म्हणून महंमदवाडी येथे स्वत:चे केस कापून केश रचना बदलली. मित्रांकडून स्वत:च्या घरातील कपडे आणून कोणास काही कळू नये, म्हणून मुंबईला जाऊन तेथून तळोजा येथील पेंदर येथे चायनीज गाडीवर काम करु लागला होता.

रॉबीन याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याने काही दिवस एका कॉल सेंटरला काम केले होते. त्याच्या वडिलांची लिंबू पाण्याची गाडी असून आई दर तीन महिन्यांनी कामासाठी हॉगकॉगला जाते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे, शकूर सय्यद, सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, अतुल साठे, संदीप तळेकर, राजू रासगे, रोहिदास लवांडे, महेंद्र पवार, गजानन गाणबोटे, शिवानंद स्वामी, संदीप राठोड, कल्याणी आगलावे, गुणशिंलन रंगम, अनिल घाडगे, अनिल भोसले, कल्पेश बनसोडे यांनी केली आहे.

Web Title: The former Captain Balinese murdered murderer did not give him the box office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे