मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष सय्यदभाई यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 08:04 PM2022-04-08T20:04:20+5:302022-04-08T20:38:12+5:30
समाजातील अन्यायाच्या विरोधात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून केला होता संघर्ष...
पुणे : मुस्लीम तलाक पीडित महिलांच्या प्रश्नांसाठी अविरतपणे संघर्ष करणारे आणि मुस्लीम समाजातील परिवर्तन हेच आयुष्याचे ध्येय मानणारे ज्येष्ठ कार्यकर्ते व मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष सय्यद महबूब शहा कादरी उर्फ सय्यदभाई (वय 86) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. समाजातील अन्यायाच्या विरोधात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करणा-या सय्यदभाईंना 2020 मध्ये पिसोळी यांच्या निवासस्थानी जाऊन जिल्हाधिका-यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी अख्तर सय्यद, मुलगा असीम, सून शाहीन व नातवंडे असा परिवार आहे.
सय्यदभाई 30 मार्चला घरात पडल्यामुळे त्यांच्या मांडीला फ्रँक्चर झाले होते. त्यांना एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. परंतु वृद्धापकाळ आणि श्वसनाचा त्रास यामधून प्रकृतीची गुंतागुंत वाढल्यामुळे शुक्रवारी उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. हमीद दलवाई यांच्या प्रभावातून ते मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे कृतीशील कार्यकर्ते झाले. त्यानंतर ते मंडळाचे अध्यक्षही झाले. एकेकाळी अहल-ए-हदिस पंथाचे कट्टर अनुयायी असलेल्या सय्यदभाईंच्या बहिणीला तिच्या नव-याने तोंडी एकतर्फी तलाक दिला. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या सय्यदभाईंनी अनेक मुस्लीम धर्मगुरू आणि इतर मंडळींशी संपर्क साधूनही त्यांना ही धर्माची बाब आहे असं सांगून हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
त्यानंतर मार्गदर्शनासाठी त्यांनी भेट हमीद दलवाईंशी झाली आणि त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. १८ एप्रिल १९६६ रोजी हमीद दलवाईंनी तलाक पीडित मुस्लीम महिलांचा मोर्चा मंत्रालयावर आयोजित केला आणि मार्च १९७० मध्ये मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. या प्रवासात हमीद दलवाईंसोबत खांद्याला खांदा लावून सय्यदभाई उभे होते. केंद्र सरकारने तोंडी एकतर्फी तलाकवर बंदी घातल्यानंतर मंडळाने याचे समर्थन केले.
२०१७ मध्ये सय्यदभाई आणि मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बहुपत्नीतव, निकाह आणि हलाला अशा अनिष्ट प्रथांवरही बंदी घालावी अशी मागणी केली होती. मुस्लीम समाजासाठी झटणारा सच्चा कार्यकर्ता गेला, अशा शब्दांत सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. सय्यदभाई यांचे ‘दगडावरची पेरणी’ हे आत्मकथनात्क पुस्तक प्रसिद्ध आहे.