बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी माजी नगरसेवक सुभाष जगताप यांना पत्नीसह अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 03:19 AM2018-11-17T03:19:32+5:302018-11-17T03:20:09+5:30
पोलिसांनी शुक्रवारी जगताप दाम्पत्याला अटक केली होती. दुपारी त्यांची जामिनावर सुटका झाली.
पुणे : पदाचा गैरवापर करून १ कोटी ३३ लाख ३९ हजार ५९२ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक सुभाष जगताप आणि त्यांच्या पत्नी उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दोषारोपपत्र दाखल केले.
पोलिसांनी शुक्रवारी जगताप दाम्पत्याला अटक केली होती. दुपारी त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यांनी आत्तापर्यंत १ कोटी ३३ लाख ३९ हजार ५९२ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. जगताप दाम्पत्याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपावरून ४ मार्च २०१५ रोजी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र उपअधीक्षक कांचन जाधव यांनी शुक्रवारी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दाखल केले. या वेळी सुभाष आणि उषा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
जगताप हे १९९५ ते २०१२ दरम्यान सहकारनगर परिसरात नगरसेवक होते. २०१४ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा त्यांच्याकडे १ कोटी ३३ लाख ३९ हजार ५९२ रुपयांची अधिकची मालमत्ता आढळून आली आहे.
तिचा हिशेब त्यांना सादर करता आलेला नाही, असे पोलिसांनी न्यायालयात म्हटले आहे. जगताप यांची उघड, त्यानंतर गुप्त चौकशी झाली होती. जगताप यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यासाठी गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये पोलिसांनी राज्य सरकारकडे चौकशी मागितली होती. त्याला गेल्या महिन्यात परवानगी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले.