पुरंदरमधील माजी उपसरपंचास मारहाण; डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2023 04:17 PM2023-03-12T16:17:16+5:302023-03-12T16:17:28+5:30
माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी जेजुरी पोलिसांत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल
नीरा : नीरा (ता.पुरंदर) येथील माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी जेजुरी पोलिसांत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीरेचे माजी उपसरपंच कुमार (बाळू) मोरे यांनी या बाबतची फिर्याद दिली आहे. तर मारहाणीत ते जखमी झाले असून त्यांच्या पायाला मार लागला आहे.
माजी उपसरपंच कुमार मोरे यांनी जेजुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार मोरे यांनी जनरल स्टोअरचे दुकान चालवण्यासाठी शकुंतला जगताप यांच्याकडून वार्ड नंबर २ मधील सिटी सर्वे नंबर ४३२ व ४३३ मध्ये एक गुंठे जागा भाड्याने घेतली होती. या ठिकाणी त्यांनी दुकानासाठी १० x १० ची टपरी टाकली होती. मात्र ही टपरी नितीन कांतीलाल बोरा यांच्या दुकानाच्या पुढील बाजूचे असल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला. गुरवार दि. ९ मार्च २०२३ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मोरे हे त्यांचे दुकान उघडण्यासाठी गेले असता नितीन कांतीलाल बोरा यांनी मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्याचबरोबर हातात गज घेऊन मोरे यांना मारहाण केली. त्याचवेळी बोरा यांचा भाऊ डॉ. दिलीप बोरा हा देखील हातात काठी घेऊन आला. त्याने सुद्धा मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यांच्या अंगावर धावून गेला. यानंतर मीना दिलीप बोरा यादेखील तेथे आल्या. त्यांनी मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. अशा प्रकारची फिर्याद मोरे यांनी जेजुरी पोलिसात दिली आहे. याबाबतचा तपास जेजुरी पोलीस करत आहेत.