एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कारावर मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 06:59 PM2018-08-30T18:59:34+5:302018-08-30T19:04:17+5:30
स्वप्निल कापुरे या माजी विद्यार्थ्याने मजदूरांवर चित्रित केलेल्या ‘थिय्या’ (अडडा) या लघुपटासाठी तो या पुरस्काराचा मानकरी ठरला. यापूर्वी ‘भर दिवसा’ या त्याच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
पुणे : ‘सायलेक्ट’(सेंटर इंटरनँशनल डी लिआसन देस इकोल्स डी सिनेमा एट डी टेलिव्हिजन)च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एफटीआयआयच्या स्वप्निल कापुरे या माजी विद्यार्थ्याने संपूर्ण देशभरातून सर्वोत्कृष्ट लघुपटाच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. मजदूरांवर चित्रित केलेल्या ‘थिय्या’ (अडडा) या लघुपटासाठी तो या पुरस्काराचा मानकरी ठरला. यापूर्वी ‘भर दिवसा’ या त्याच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
एफटीआयआयच्या २०१६-१७ बॅचचा स्वप्निल कापुरे हा विद्यार्थी आहे. विद्यार्थी दशेत असताना त्याने मजदुरांच्या जीवनाचे भीषण वास्तव मांडणारा ‘थिय्या’ या लघुपटाची निर्मिती केली होता. खासगी आणि सरकारी फिल्म स्कूलशी संलग्न असलेल्या ‘सायलेक्ट’ असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एफटीआयआय प्रशासनातर्फे हा लघुपट पाठविण्यात आला होता. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेसाठी पाठविण्यात आलेल्या कलाकृतींची निवड ज्युरी सदस्यांकडून केली जात नाही, तर ६५ देशातील १८० इन्स्टिट्यूटचे सदस्यांकडून ही कलाकृती पाहिली जाते. त्यानंतर त्यातील उत्कृष्ट कलाकृतीसाठी मतदान केले जाते. संपूर्ण देशभरामध्ये केवळ एफटीआयआय, सत्यजित रे इन्स्टिट्यूट आणि व्हिसलिंग वूडस याा तीनच फिल्म इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय असोसिएशनशी संलग्न आहेत.
यासंदर्भात स्वप्निल कापुरे याच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्याने व्यक्त केली. तो म्हणाला, आमचे घर बांधत असताना लहानपणी बाबा मोठ्या भावाला थिय्याला पाठवायचे आणि कुणी आहे का हे पाहायला सांगायचे मला तो थिय्या शब्द कळत नव्हता. मग पुण्यात आल्यानंतर डांगे चौकात मजदुरांची गर्दी दिसायची. त्यावर मग लघुपट करायचे ठरविले. घरातून बाहेर पडताना हाताला काम मिळेल का नाही हे त्या मजदूरांना माहिती नसते, या लघुपटामुळे त्यांचे जीवन जवळून अनुभवता आले. या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे जबाबदारी खूप वाढली असल्याचे त्याने सांगितले.