"आधीचे सरकार घरी, आम्ही लोकांच्या दारी" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 04:23 PM2023-06-16T16:23:49+5:302023-06-16T16:30:41+5:30
पुणे जिल्ह्याची ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जोरदार कामगिरी...
पुणे : शासन आपल्या दारी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामान्यांना त्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे एकाच छताखाली मिळत आहेत. आतापर्यंत दोन लाख ८६ हजार लोकांनी याचा लाभ घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आधीचे सरकार घरी होते आमचे सरकार घरी जातेय. आमची युती कमजोर नाही. आम्ही लोकांमधले कार्यकर्ते आहोत. आम्ही सामान्यांच्या समस्या जाणून घेतो. पुणे जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जोरदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत शासनाच्या विविध योजना व सेवांचे २ लाख ८६ हजार २७८ लाभ नागरिकांना वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीदेखील या अभियानात सहभाग घेतला आहे.
या अभियानांतर्गत पुणे शहरात १७ हजार ५९३, हवेली २८ हजार ७७९, मुळशी ३ हजार ९५०, भोर २८ हजार ४४२, मावळ १५ हजार ६२२, वेल्हे ८ हजार ५७६, जुन्नर ३५ हजार ९८३, खेड १० हजार ८३७, आंबेगाव २४ हजार २०३, शिरुर ३४ हजार ४४९, बारामती २४ हजार ५९६, इंदापूर ३६ हजार ८४३, दौंड ७ हजार ६०३, पुरंदर ८ हजार ३६० आणि अप्पर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवडच्या कार्यक्षेत्रात ४४२ लाभाचे वाटप करण्यात आले.
अभियानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याचा त्रास वाचावा आणि वेळेत त्यांना लाभ मिळावा असे प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अभियानात चांगला सहभाग घेतला असून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आवश्यक दाखलेदेखील मोहिमस्तरावर देण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी व्यक्त केली आहे.