पुणे विद्यापीठ मराठी विभागाचे माजी प्रमुख कल्याण काळे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:11 AM2021-01-18T04:11:05+5:302021-01-18T04:11:05+5:30
काळे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा येथे १६ डिसेंबर, १९३७ रोजी झाला. त्यांनी संस्कृत व मराठी विषयात एम.ए. पदवी ...
काळे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा येथे १६ डिसेंबर, १९३७ रोजी झाला. त्यांनी संस्कृत व मराठी विषयात एम.ए. पदवी घेतली, तसेच पुणे विद्यापीठातून १९७८ मध्ये पीएच.डी. मिळविली. ‘परांड्याचे हंसराजस्वामी: जीवन, साहित्य आणि तत्त्वज्ञान’ हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता. त्यांनी बार्शी येथे माध्यमिक स्तरावर अध्यापन सुरू केले. नंदूरबार येथे जी. टी. पाटील महाविद्यालयात प्राध्यापक आणि त्यानंतर विद्यापीठाच्या मराठी विभागात १९८१ ते १९९७ या काळात त्यांनी अधिव्याख्याता ते विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. विविध विद्यापीठांमधील प्राध्यापकांसाठी उद्बोधन व प्रशिक्षण वर्गासाठीचे तज्ज्ञ मार्गदर्शक, मराठी साहित्य, संतसाहित्य, भाषाविज्ञान, शैलीविज्ञानचे गाडे अभ्यासक, अशी त्यांची ओळख होती. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. तर ११ विद्यार्थ्यांनी एम.फिल. पदवी मिळविली. त्यांना राज्य शासनाचा २०१८चा डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार मिळाला होता. त्यांनी २५हून अधिक पुस्तकांचे लेखन केले. डॉ.अंजली सोमन यांच्या सहकार्याने लिहिलेली भाषांतर मीमांसा, आधुनिक भाषाविज्ञान, लर्निंग मराठी ही पुस्तके त्यांच्या नावे आहेत.