"देवेंद्र फडणवीसांनी मला धमकी दिली अन् दिलगिरीही व्यक्त केली"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 01:27 PM2023-02-15T13:27:00+5:302023-02-15T13:27:38+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून ‘तुम्हाला हे त्रासदायक होईल’, असे थेट सांगितले...
पुणे : मी महापौर असताना ‘स्मार्ट सिटी’च्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. त्यांच्या निमंत्रण पत्रिकेवर महापौरांचे नाव नव्हते. त्यामुळे कार्यक्रमात सहभागी न होण्याचे जाहीर केले. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून ‘तुम्हाला हे त्रासदायक होईल’, असे थेट सांगितले होते. मात्र, नंतर त्याविषयी दिलगिरीही व्यक्त केली होती, असे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.
‘लोकमत’ने महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहसंवादात त्यांचे नाव निमंत्रणपत्रिकेत नसल्यावरून झालेल्या वादामागच्या अनेक गोष्टी उलगडल्या. जगताप म्हणाले, स्मार्ट सिटीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. महापौर म्हणून त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर नावच नव्हते. त्यामुळे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांच्याबरोबर सल्लामसलत केली व कार्यक्रमाला जाणार नाही, असे जाहीर केले. तत्पूर्वी शरद पवार यांनाही सांगितले. त्यांनी पुणेकरांना काय आवडेल, असे विचारले व त्याप्रमाणे निर्णय घेण्याचे सुचवले.
मात्र, महापौर म्हणून असलेली जबाबदारी पार पाडावी, तयारीत काही कमी पडू नये म्हणून सायंकाळी कार्यक्रमस्थळी गेलो. तिथे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी थेट फडणवीस यांनाच फोन लावून दिला. त्यावेळी फडणवीस यांनी मला, ‘हा कार्यक्रम पंतप्रधानांचा आहे, तुम्हाला पुढे त्रास होईल’ असे धमकीवजा सौम्य शब्दांमध्ये सांगितले. ‘महापौरांचे नाव नाही यात राज्य सरकार किंवा माझे काहीच नाही, तो पंतप्रधान कार्यालयाचा कॉल आहे. त्यामुळे विचार करा,’ असे सांगितले.
त्यानंतर काय झाले माहिती नाही. मात्र, शरद पवार यांनी मला रात्री उशिरा फोन केला. काही मेसेज आला का म्हणून विचारले. मी नाही असे सांगताच, त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेले निवेदनच वाचून दाखवले. त्यात पुण्याच्या महापौरांचे नाव चुकून राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती. पालकमंत्रीही तुझ्याबरोबर बोलतील, असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे गिरीश बापट यांनीही दुसऱ्या दिवशी माफी व्यक्त केली व या वादावर पडदा पडला. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
पंतप्रधान मोदी यांनीही या वादाची दखल घेतली. भाषण करताना त्यांनी व्यासपीठावर मागे वळून माझ्याकडे पाहिले व ‘प्रशांतजी, आपके गुण कितने है?’ अशी विचारणा केली. त्यावेळी स्मार्ट सिटीमध्ये पुणे महापालिकेचा देशात दुसरा क्रमांक होता. मी तसे सांगितल्यालर, ‘प्रथम कैसे आऐंगे इसपर धान्य दो,’ असे त्यांनी हसत-हसत सांगितले.
- प्रशांत जगताप, माजी महापौर