माजी महापौरांनी उचलला ससूनच्या परिचारिकांच्या जेवणाचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:09 AM2021-04-26T04:09:22+5:302021-04-26T04:09:22+5:30
पुणे : ससून रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ४०० खाटांच्या कोविड कक्षात तब्बल ३५० परिचारिकांची नेमणूक केली आहे. या ...
पुणे : ससून रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ४०० खाटांच्या कोविड कक्षात तब्बल ३५० परिचारिकांची नेमणूक केली आहे. या परिचारिकांच्या दोन महिन्यांच्या जेवणाचा खर्च माजी महापौर प्रशांत जगताप यांनी उचलला आहे. पाच लाख रुपयांचा धनादेश त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
ससून रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी नव्याने ४०० बेड तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी ३५० परिचारिकांची भरती केली आहे. त्यांच्या ३ वेळेच्या जेवणाची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा ससून रुग्णालयाने व्यक्त केली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशांत जगताप मित्र परिवाराच्या वतीने रुग्णालयाला परिचारिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेकरिता पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी देण्यात आला. यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, अधीक्षक डॉ. अजय तावरे उपस्थित होते.