माजी महापौर दत्ता एकबोटे यांचे कोरोनाने निधन; पुण्यातील कमकुवत आरोग्य यंत्रणेचा अजून एक बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 11:55 AM2020-09-03T11:55:25+5:302020-09-03T11:58:39+5:30
कोरोनाचे निदान झाल्यावर दत्ता एकबोटे यांनी अनेक रुग्णालयांशी संपर्क केला मात्र त्यांना बेड उपलब्ध होऊ शकला नाही.
पुणे : ज्यांनी कष्टकरी वर्गासाठी आयुष्यभर काम केले, गरिबांचे अंत्यविधी पालिकेच्या खर्चातून करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, विडी कामगारांना हक्काची घरे मिळवून दिली, महापौर म्हणून आपली कारकीर्द गाजविली अशा एका माजी महापौराला उपचारांसाठी पुण्यात एकाही खासगी रुग्णालयात खाट उपलब्ध झाली नाही. ससूनमध्ये उपचार घेण्यासाठीही पालकमंत्री, खासदार यांचे दूरध्वनी जावे लागले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या अंत्यविधीसाठीही तीन तीन स्मशानभूमीत त्यांचा मृतदेह फिरवावा लागला. एका माजी महापौराची ही परवड प्रशासकीय व्यवस्थेतील असंवेदनशीलतेचा कळस आहे.
माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे (वय ८४) यांचे गुरुवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. एकबोटे यांच्या मुलीचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. त्यांचा मुलगा रवी (वय ४५) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. तर, एकबोटे हे रत्ना हॉस्पिटलमध्ये एडमिट होते. उपचार घेऊन ते घरी परतले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यांनी शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये फोन करून एडमिट होण्यासाठी संपर्क साधला. परंतु, रुग्णालयांनी खाटा उपलब्ध नसल्याचे सांगत प्रवेश नाकारला. त्यानंतर, ते स्वतः ससून रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान, त्यांच्या मुलाचा ३१ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ससूनमध्ये एकबोटे यांना व्यवस्थित उपचार मिळत नव्हते. त्यांचा २४ वर्षांचा नातू गौरव हाच सगळीकडे धावपळ करीत होता. एकीकडे वडिलांचा झालेला मृत्यू, दुसरीकडे आजोबा दवाखान्यात, आजी घरात विलगिकरणात अशा परिस्थितीत गौरव धावपळ करीत होता. एकबोटे यांना नीट उपचार मिळत नसल्याची माहिती मिळाल्यावर माजी नगरसेविका मीनाक्षी काडगी आणि त्यांचे पती ज्ञानेश्वर काडगी यांनी माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, खासदार गिरीश बापट यांच्याशी संपर्क साधत उपचारांसाठी लक्ष घालण्याची विनंती केली. दरम्यान, काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली. पवार यांनी ससून रुग्णालयाला उपचारासंबंधी सूचना केल्या. त्यानंतर, उपचार व्यवस्थित सुरू करण्यात आले.
उपचार सुरू असतानाच त्यांचा गुरुवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्यासाठी किराड यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांचा मृतदेह घेऊन कैलास स्मशानभूमीत पोचल्यावर वेळ लागेल असे सांगत त्यांना येरवडा स्मशानभूमीत पिटाळण्यात आले. तेथे, गेल्यावर अंत्यविधीसाठी बराच वेळ लागेल असे सांगून त्यांना पुढे पाठविण्यात आले. शेवटी कोरेगाव पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एकबोटे यांच्या मागे दोन मुली, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.
------//------
गरीबांचे लढाऊ नेते अशी ओळख असलेले एकबोटे हे समाजवादी विचारांचे होते. समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून काम केले. कष्टकऱ्यांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली आणि तुरुंगवासही भोगला. आणीबाणीतही हे स्थानबद्ध होते. गोल्फ क्लब आणि खराडी इथे विडी कामगारांसाठीची शेकडो घरे उभारली. राणाप्रताप उद्यानात त्यांच्या पुढाकाराने एस. एम. जोशी यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांनी उभारला. महात्मा फुले पेठेतून ते निवडून येत.