'त्या' ९० मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज माजी मंत्री संजय राठोडांचाच: पुणे पोलिसांचा दुजोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 01:27 PM2021-08-03T13:27:27+5:302021-08-03T13:28:47+5:30
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
पुणे: पूजा चव्हाण हिची आत्महत्या होण्यापूर्वी तिचा आणि एका व्यक्तीमध्ये झालेले संभाषण व्हायरल झाले होते. या संभाषणातील एक आवाज माजी मंत्री संजय राठोड यांचा असल्याचा अहवाल न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेने दिला होता. याला पुणे पोलिसांनी अधिकृतपणे दुजोरा दिला असून हा अहवाल दोन महिन्यांपूर्वीच मिळाल्याचे सांगितले आहे.
पूजा चव्हाण हिने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यातील राहत्या घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
आत्महत्येआधी पूजा आणि राठोड यांच्यात ९० मिनिटे फोनवर बोलणे झाल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांना फॉरेन्सिक अहवालात देण्यात आला आहे. पूजाच्या आत्महत्येपूर्वी सुमारे ९० मिनिटे पूजा हीच संजय राठोड यांच्याशी फोनवर बोलणे झाल्याची माहिती समोर आली आहे. हे संभाषण वंजारा भाषेत होते.
व्हिसेरा रिपोर्टमध्ये पूजाने आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केल्याचेही निष्पन्न झाले आहे. दारूच्या नशेत तिने आत्महत्या केली असावी. असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र असे असले तरी पूजाच्या आईवडिलांनी दिलेल्या जबाबात कुठलीही तक्रार नसल्याचे यापूर्वीच लिहून दिले आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट पुणे पोलिसांनी सादर केल्याची अफवा उठली होती. मात्र असा कोणताही क्लोजर रिपोर्ट सादर केला नसून अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची तांत्रिकदृष्ट्या तपासणी पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती. सुरुवातीला १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यातील दोन व्यक्तीमधील संभाषणात पूजा चव्हाणबरोबर बोलणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा आवाज हा संजय राठोड यांचा असल्याचा वृत्ताला फॉरेन्सिक अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे.