माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका, मुलीच्या पत्राने कौटुंबिक कलह समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:33+5:302021-06-23T04:08:33+5:30
ममता शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून म्हटले आहे की, माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था ...
ममता शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून म्हटले आहे की, माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. ममता या पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी फेसबुकवरून त्यांची व्यथा मांडली.
यापूर्वीही कित्येक वर्षे असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र, कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. कारण, यामुळे माझे भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाला हानी पोहचेल असं त्यांना वाटत होतं व आजही वाटते. प्रकृती गंभीर असल्याने जिवाला धोका असताना मोठा भाऊ सतत धमक्या देऊन त्यांना मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षापासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलिसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आलं नाही. आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय आणि विनस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून घेण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. मी स्वत: डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा देत पूर्णवेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला.
११९४ साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य त्या आज २७ वर्षांनंतर का आठवाव्यात? असा सवाल करून ममता लांडे यांनी म्हटले आहे की, बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने २०१८ पर्यंत का सांभाळला? बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली?
मंदाकिनी शिवतारे यांनी या आरोपावर म्हटले आहे की, गेल्या २७ वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून वेगळं राहत आहेत. पहिली ५ वर्षे ते एका महिलेसोबत लग्न करून राहत होते. त्यानंतर आतापर्यंत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहतात. ममताने विनय आणि विनस या दोघांवर केलेले आरोप धांदात खोटे आहेत. उज्ज्वला बागवे या महिलेसोबत विजय शिवतारे यांनी लग्न केले होते. त्यानंतर मीनाक्षी पटेल नावाच्या महिलेसोबत ते पवईला राहतात. यात संपत्तीचा कुठलाही वाद नाही.