माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामिन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:10 AM2020-12-25T04:10:29+5:302020-12-25T04:10:29+5:30
पुणे : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. ...
पुणे : कन्नडचे माजी आमदार
हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. आर. मालवणकर यांनी हा निकाल दिला.
ज्येष्ठ दाम्पत्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली जाधव हे सध्या अटकेत आहेत. संबंधित गुन्ह्याचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याचे पत्नीकडून सांगितले जात असतानाही जाधव यांनी अजय चड्डा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.
जाधव यांच्या विरोधात आतापर्यंत विविध १२ गुन्हे दाखल असून एका गुन्ह्यात शिक्षा झाल्याचा युक्तिवाद सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी केला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर यु मालवणकर यांनी तो मान्य करत जाधव यांचा जामीन अर्ज नामंजूर केला.
अजय व ममता चड्डा हे ज्येष्ठ दांपत्य दुचाकीवरून औंध परिसरातून जात होते. यावेळी, एका बँकेजवळ झालेल्या अपघाताच्या कारणावरून जाधव यांनी गाडीचे दार अचानक उघडल्याने ममता यांना अपघात होऊन त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्याचा जाब विचारण्यासाठी अजय हे गेले असता त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, ममता यांनाही शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.
बचाव पक्षाच्या वतीने केलेल्या जामीन अर्जास विरोध करत सरकारी वकील गेहलोत म्हणाले, संबंधित गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा व अजामीनपात्र आहे. आरोपी हा आक्रमक स्वभावाचा व गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो गुन्ह्यातील फिर्यादी, साक्षीदार व त्यांचे कुटुंबिय यांज्यावर दबाव निर्माण करून त्यांना धमकावुन तपासात अडथळा आणण्याची शक्यता आहे. मारहाण केल्यानंतर अजय जड्डा यांना कमी तीव्रतेचा ॲटॅक आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आरोपीने ज्या प्रकारे चड्डा यांना मारहाण केली त्यावरून त्याला कायद्याचा कोणताही धाक नसल्याचे दिसून येत आहे. त्याला जामीन मंजूर झाल्यास तो न्यायालयात सुनावणीच्या वेळी हजर राहील याची कोणतीही शाश्वती वाटत नसल्याने, त्याचा जामीन फेटाळण्याची विनंती केली. न्यायलयाने ती मान्य केली.