माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांची घरे फोडून ५३ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:16 AM2021-09-07T04:16:06+5:302021-09-07T04:16:06+5:30
पुणे : माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे पुतणे हरिश्चंद्र मोझे व मोहन मोझे यांची घरे फोडून चोरट्यांनी तब्बल ५३ ...
पुणे : माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे पुतणे हरिश्चंद्र मोझे व मोहन मोझे यांची घरे फोडून चोरट्यांनी तब्बल ५३ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी हरिश्चंद्र ऊर्फ राजू मनोहर मोझे (वय ४९, रा. राम मंदिराजवळ, संगमवाडी, येरवडा) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली.
मोझे व त्यांचे भाऊ मोहन मोझे हे त्यांच्या घराला कुलूप लावून ३ सप्टेंबरला महाबळेश्वर येथे गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी घराच्या दरवाजांची कुलूपे तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममधील कपाटातील लॉकर उचकटून त्यांत ठेवलेले ४० लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे, चांदीचे दागिने, किमती घड्याळे चोरुन नेली. तसेच मोहन मनोहर मोझे यांच्या घरात घरफोडी करून सोन्याचे दागिने, किमती घड्याळे, रोख रक्कम असा १३ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मोझे कुटुंबीय रविवारी सायंकाळी घरी परतले. तेव्हा घरफोडी झाल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक समीर करपे अधिक तपास करीत आहेत.
.......
मोझे कुटुंबीयांच्या दोन्ही घरांतील तब्बल ८५ तोळे सोने, रोख रक्कम व महागडी घड्याळे चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून तपासासाठी दोन पथके आरोपींच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल.
- पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त,
बाजूला दागिने काढून ठेवले म्हणून वाचले
महाबळेश्वर याठिकाणी फिरायला जाणार असल्याने मोहन मोझे यांनी घरातील काही दागिने दुसरीकडे ठेवले होते. त्यामुळे चोरट्यांच्या निदर्शनास आले नाहीत. त्यामुळे ते दागिने सुरक्षित राहिले. हरिश्चंद्र मोझे यांच्या घरातील सर्व दागिने, लहान मुलांची खेळणी, ब्रँडेड बूट, महागडी घड्याळे चोरांनी चोरून नेली.