माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:27+5:302021-05-11T04:10:27+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. बारामती तालुक्यातील निंबूत येथील मातब्बर काकडे घराण्यात ...
बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. बारामती तालुक्यातील निंबूत येथील मातब्बर काकडे घराण्यात त्यांचा जन्म झाला. संभाजीराव यांनी राज्यस्तरावर आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवत अनेक कार्यकर्ते घडविले. माजी मंत्री बबनराव पाचपुते, बबनराव ढाकणे, कै. किसनराव बाणखेले, संभाजीराव पवार यांसारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडविले. काकडे १९७१ मध्ये विधान परिषदेवर पहिल्यांदा आमदार झाले. त्या वेळचे कॉंग्रेसचे मातब्बर रंगराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. ही निवडणूक काकडे यांनी अपक्ष म्हणून लढविली होती.
१९७८ तसेच १९८२ या साली ते बारामती लोकसभा मतदासंघातून लोकसभेवर निवडून गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्या काळी संभाजीराव काकडे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर विरोधक मानले जात असत. काकडे हे सुरुवातीला सिंडिकेट कॉंग्रेस, नंतर जनता पक्ष तसेच जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते. माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. कार्यकर्त्यांत ते लाला नावाने ओळखले जात.