भाजपचे माजी खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नीला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 02:40 PM2020-11-05T14:40:24+5:302020-11-05T14:48:39+5:30

मेव्हुण्याला ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण   

Former MPs Sanjay Kakade and Usha Kakade arrested; Case of threatening to kill brother in law | भाजपचे माजी खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नीला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक

भाजपचे माजी खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नीला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक

Next
ठळक मुद्देन्यायालयात हजर केल्यानंतर जामिनावर सुटका

पुणे : भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना आज सकाळी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली. मेव्हुण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तसेच आज त्यांच्या विरोधात दोषारोपत्रही दाखल करण्यात आले.

युवराज ढमाले (वय, ४०) यांनी याबाबत काकडे यांच्याविरूध्द फिर्याद दिली आहे. ढमाले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी ढमाले यांच्यामध्ये सुरुवातीला भागीदारीत व्यवसाय होता. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे २०१० पासून दोघेही स्वतंत्ररीत्या व्यवसाय करतात. ऑगस्ट २०१८ मध्ये फिर्यादी ढमाले हे संजय काकडे यांच्या घरी गेले असता काकडे यांनी त्यांना, तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल, अशा शब्दात धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी आज सकाळी काकडे दाम्पत्याला अटक करून पोलिस बंदोबस्तात  न्यायालयात हजर केले.त्याचबरोबर ढमाले यांनी फिर्याद दिल्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्रदेखील शेवाळे यांनी न्यायालयात दाखल केले. काकडे दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी विनंती रिमांड रिपोर्टमध्ये करण्यात आली होती. मात्र बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर दोघांनाही प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. ढमाले यांच्यावतीने ॲड. विजयसिंग ठोंबरे यांनी कामकाज पाहिले. 
.........
जामिनाच्या अटी व शर्ती

- पोलिस बोलवतील तेव्हा पोलिस ठाण्यात हजर व्हायचे
- तपासात पोलिसांना सहकार्य करायचे
- न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जायचे नाही
- साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही
- पत्ता व ओळखपत्राची कागदपत्रे न्यायालयात सादर करावेत

.....................................

"हा कौटुंबिक वाद आहे..'': संजय काकडे
 दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने आता केला आहे. या दोन वर्षात फिर्यादीबरोबर माझे व पत्नीचे साधे बोलणे देखील झालेले नसताना मग आत्ताच हे आरोप का केले याचे आश्चर्य वाटत आहे. आता याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आज न्यायालयात प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. "हा कौटुंबिक वाद आहे. आणि या प्रकरणी आम्ही न्यायालयाची प्रक्रिया पाळत आहोत." 
- संजय काकडे, माजी खासदार

Web Title: Former MPs Sanjay Kakade and Usha Kakade arrested; Case of threatening to kill brother in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.