राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पानसरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 04:39 PM2023-07-09T16:39:51+5:302023-07-09T16:40:48+5:30
जमिनीच्या वादातून मेहबूबभाई पानसरे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता
जेजुरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे यांच्या खुनातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून इतर दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली
शुक्रवारी दि. ७ जुलै रोजी जमिनीच्या वादातून जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे यांचा नाझरे जलशयानाजीकच्या वादग्रस्त जमिनीत कुऱ्हाड, कोयता आणि पहारीने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. जेजुरी पोलिसांनी यातील आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून यातील दोन आरोपीना अटक केली होती.
गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध करण्यासाठी जेजुरी पोलिसांकडून आरोपींची माहिती पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिली होती. त्यानुसार या गुन्ह्याची गंभीरता आणि संवेदनशीलता ओळखून पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबतच्या सूचना पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांना सूचना दिल्या होत्या. काल दि. ८ जुलै रोजी जेजुरीतील गुन्ह्याचे दोन आरोपी डेक्कन परिसरात असल्याची गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, प्रदीप गाडे, चेतन अपाटे, सैदोबा भोजराज, पवन भोसले आदींची दोन वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध घेऊन मुख्य आरोपी वनिस प्रल्हाद परदेशी, रा. ४०४ गुरुवार पेठ, पुणे, मूळ रा. बेंद वस्ती, धालेवाडी जेजुरी आणि काका परदेशी उर्फ महादेव विठ्ठल गुरव ( वय ६५ ,वर्षे ) रा. बेंद वस्ती, धालेवाडी जेजुरी मूळ रा. वाजेगाव ता. फलटण जि सातारा या दोघांना अटक केली. तपासात दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दोन्ही आरोपीना सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि.१२ जुलै पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून अजून ही दोघांचा शोध वेगवेगळ्या पथकाकडून घेतला जात असल्याची माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली.