माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देवदर्शनासाठी पुण्यात; दगडूशेठ, दत्तमहाराज, श्री महालक्ष्मीचे घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 04:14 PM2022-09-25T16:14:10+5:302022-09-25T16:15:27+5:30
रामनाथ कोविंद यांच्यासमवेत पत्नी सविता कोविंद व कुटुंबिय उपस्थित होते
पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ गणपती, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दत्तमहाराज आणि सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद व कुटुंबिय उपस्थित होते. तिन्ही मंदिरांमध्ये त्यांनी दर्शन घेण्यासोबत आरती केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोविंद यांचे सकाळी १०.३० वाजता मंदिरात स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी गणरायाला सपत्नीक अभिषेक देखील केला. तसेच सुख-समृद्ध व आरोग्यसंपन्न्नेकरीता श्रींकडे प्रार्थना केली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
सकाळी १०.५० वाजता बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी दत्तमहाराजांची आरती केली. ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. महावस्त्र, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन कोविंद यांचा सन्मान करण्यात आला.
सकाळी ११.१५ वाजता श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने रामनाथ कोविंद व सविता कोविंद यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. नवरात्रीनिमित्त मंदिरात सुरु असलेल्या तयारीची कोविंद यांनी पाहणी करण्यासोबतच नवरात्रीनिमित्त शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा अमिता अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, भरत अग्रवाल, अॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.