पुण्याचे माजी सहायक पोलिस आयुक्त मनोहर जोशी हे ठरले राष्ट्रीय विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 04:52 PM2023-02-14T16:52:50+5:302023-02-14T16:53:00+5:30
पोलिस आयुक्त मनोहर जोशी यांनी केलेल्या विजयी कामगिरी बद्दल त्यांचे पोलिस दलासह पुणे शहरात कौतुक
पुणे : राजस्थान - उदयपूर येथील चौफुला बॅडमिंटन राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्याचे माजी सहायक पोलिस आयुक्त मनोहर जोशी यांनी बाजी मारली असून राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली आहे. योनेक्स सनराइज ऑल इंडिया मास्टर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा 2023 ह्या राजस्थान - उदयपूर येथील चौफुला बॅडमिंटन अकॅडमी येथे दि. 17 जानेवारी 23 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान भरविण्यात आल्या. ह्या स्पर्धेचे आयोजन राजस्थान बॅडमिंटन असोसिएशन व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने उदयपूर बॅडमिंटन असोसिएशनने भरविल्या आल्या. सदरच्या स्पर्धा 35 ते 75 या वयोगटापर्यंतच्या सर्व वर्गामध्ये घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धेमध्ये एकूण 916 जणांनी भाग घेतला होता.
ह्या स्पर्धा 35 ते 40, 40 ते 45, 45 ते 50, 50 ते 55, 55 ते 60, 6० ते 65, ६५ ते 70, 70 ते 75, 75 ते 80 या वयोगटात भरविण्यात आल्या. त्या स्पर्धेसाठी पुण्यातून मनोहर जोशी, राम मोहन काशीकर, प्रदीप कुंडाजी, रमेश गोलांडे, अनिल भंडारी, संजय परांडे, विजया गुडीपुडी, मंजुषा सहस्रबुद्धे अशा वरिष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. ६५ + वयोगटात मनोहर जोशी यांना बॅडमिंटन ऑफ इंडियाने एक नंबर सीड दिले होते, तर संजय फरांडे यांना दोन नंबर सीड दिले होते. 65 वर्षावरील गटात मनोहर जोशी यांनी नागपूरचे शरद महाजन यांचा 13 -21 , 25 -23, 21- 19 असा पराभव केला आहे. ही मॅच पन्नास मिनिटांपर्यंत चालली होती. तत्पूर्वी जोशी यांनी जगदीश मूलचंदानी यांचा 21- 9, 21- 6, किशोर भाई पटेल गुजराथ यांचा 23- 21 , 15 -21 , 21-09 असा तर राजस्थानचे प्रदीप कुमार तेलंग यांचा 21- 15, 21-07 असा पराभव केला होता. मनोहर जोशी हे ६५ + वयाच्या गटामध्ये राष्ट्रीय विजेते ठरलेले आहेत. पुण्याचे माजी सहायक पोलिस आयुक्त मनोहर जोशी यांनी केलेल्या विजयी कामगिरी बद्दल त्यांचे पोलिस दलासह पुणे शहरात कौतुक होत आहे.