दौैंडचे माजी आमदार बाळासाहेब जगदाळे कालवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 02:24 AM2018-12-02T02:24:35+5:302018-12-02T02:24:38+5:30
दौंडचे माजी आमदार तथा गावचे पाटील कृष्णराव ऊर्फ बाळासाहेब जगदाळे पाटील (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
दौंड : दौंडचे माजी आमदार तथा गावचे पाटील कृष्णराव ऊर्फ बाळासाहेब जगदाळे पाटील (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी माजी आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे, मुलगे जिल्हा परिषदेचे सदस्य वीरधवल जगदाळे, नगरसेवक इंद्रजित जगदाळे, सुना, तीन विवाहित मुली व नातवंडे, असा परिवार आहे. बाळासाहेब जगदाळे नेपाळच्या राणा घराण्यातील होते.
कोल्हापूरला त्यांचे शिक्षण झाले. १९५४ मध्ये दौंड येथे जगदाळे परिवारात ते दत्तक म्हणून आले. दरम्यान, शरद पवारांचे कट्टर
समर्थक असल्याने त्यानुसार १९८० मध्ये एस काँग्रेसमधून ते आमदार झाले. कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेले राज्यात पहिल्या दहा आमदारांत त्यांचा नामोल्लेख केला जातो. निष्कलंक, अजातशत्रू, स्पष्ट वक्ते, सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाणे ही त्यांची ख्याती होती. पाटस (ता. दौैंड) येथील भीमा सहकारी साखर कारखाना उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. भीमा पाटस कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष होते. दौैंड तालुक्यातील शैैक्षणिक अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी दौैंड महाविद्यालय सुरू केले.
तालुक्याच्या पूर्व भागात आलेगाव परिसरात त्यांनी सहकारी तत्त्वावर दौैंड सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. परंतु शासनाच्या बदलत्या ध्येयधोरणानुसार या सहकारी कारखान्याचे रुपांतर दौैंड शुगरमध्ये झाले. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा, म्हणून त्यांनी बाळासाहेब जगदाळे पाटील या नावाने पतसंस्था उभारली. गावचे ग्रामदैैवत श्री काळभैैरवनाथ मंदिराच्या जीर्णाेद्धाराचा त्यांचा संकल्प होता. त्यानुसार मंदिरातील जीर्णोद्धार अंतिम टप्प्यात आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.